शिवसेनेचा विमा कंपन्यांविरोधात 17 जुलैला इशारा मोर्चा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविम्यासाठी विमा कंपन्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. शिवसेना येत्या 17 जुलैला विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढणार आहे.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविम्यासाठी विमा कंपन्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. शिवसेना येत्या 17 जुलैला विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढणार आहे. सर्व विमा कंपन्यांना इशारा देण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुलात शिवसेनेचा इशारा मोर्चा असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. हा शेतकर्यांचा मोर्चा नसेल, हा शेतकर्यांसाठी मोर्चा असेल, असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. जशी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दारावर बँकांची नोटीस लागते, तसंच आता कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावे बँकांच्या दारावर लावण्यात यावी, असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
बुधवरचा मोर्चा इशारा आहे, त्यानंतर विमा कंपन्याना शिवसेनेच्या भाषेत सांगू. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावं बँकेबाहेर लावली पाहिजेत अशी आमची मागणी आहे, असं उद्धव म्हणाले.
सर्व विमा कंपन्यांना इशारा आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या ऑफिसवर बुधवरी धडक मोर्चा काढण्यात येईल. सर्व पीक विमा कंपन्यांना हा इशारा असून, कोणत्या एका कंपनीविरोधात हा मोर्चा नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
कृषीमंत्री पी साईनाथ यांच्यासोबत चर्चा झाली. हा मुद्दा आता शिवसेनेचे खासदार संसदेत उचलतील. कृषी आयोग वेगळा असावा अशी आमची मागणी आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. आमचे मुद्दे भाजपनेही स्वीकारले आहेत. शेतकरी कर्जमाफी आणि पंतप्रधान विमा योजना यावर चर्चा झाली. पीक विमा आणि कर्जमाफी या चांगल्या योजना आहेत. सरकार बदललं मात्र यंत्रणा तीच असल्यामुळे योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचत नाही, अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली.