संजय राऊत मोदी-शहांची भेट का घेणार? संशयी नजरा अन् प्रश्नांना उद्धव ठाकरेंचं उत्तर काय?
राऊतांनी न डरता जिंकू शकतो हे दाखवून दिलं आहे. त्याने देशासमोर उदाहरण दिलं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांचं कौतुक केलं.
मुंबईः पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी 102 दिवस जेलमध्ये राहून आल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांची जामीनावर सुटका झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ते लवकरच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांसमोर संजय राऊत झुकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
एवढे दिवस झुकेगा नही… असं म्हणणारे संजय राऊत आता नरमणार का, असं शंकेचं मोहोळ उभं राहतंय. आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याचं उत्तर दिलं. ते म्हणाले, त्यांना मांडवली करायची असती तर तेव्हाच केली असती, 102 दिवस जेलमध्ये का घालवले असते?
संजय राऊत यांची मंगळवारी जामीनावर सुटका झाली. बुधवारी संजय राऊत हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. यावेली आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला केंद्रीय तपास यंत्रणांवर घणाघात केला. त्यानंतर देशातील न्यायव्यवस्थेभोवती निर्माण झालेल्या शंकांवर टिप्पणी केली. मात्र राऊतांच्या बाबतीत कोर्टाने परखड मत मांडल्याबद्दल कोर्टाचे आभार मानले.
उद्धव ठाकरेंचं उत्तर इथे पाहा–
संजय राऊत मोदी आणि शहांना का भेटणार, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ संजय राऊत माझ्या बाजूला बसले आहेत. त्याला काही करायचं असेल तर त्याने उघड उघड केलं असतं. तिकडे जाऊन त्याला मांडवली करायची असती तर तो शंभर दिवस तरुंगात राहिला नसता. पण त्याने दाखवून दिलयं.
राऊतांनी न डरता जिंकू शकतो हे दाखवून दिलं आहे. त्याने देशासमोर उदाहरण दिलं आहे. आपचे लोकंही लढत आहे. तेलंगणाच्या लोकांनी प्रकरणच बाहेर आणलं आहे. सोरेन आणि ममता दीदींना छळत आहे. हे सर्व एकत्र झाले तर किती मोठी ताकद उभी राहील याची ताकद त्यांना माहीत नाही, असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं.