मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तेव्हापासून उद्धव ठाकरे मंत्रालयात किंवा विधानभवन (Vidhan Bhavan) परिसरात फिरकले नाही. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना त्यांनी आपण विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, अद्याप त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला उद्धव ठाकरे जातीने हजर होते. जवळपास तासभर चाललेल्या या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे यांनी यावेळी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कोरोनाचा सामना केला, त्यापुढे हे संकट काय? असा प्रतिसवाल ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींना केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच दिवसानंतर आम्ही तिनही पक्षाचे नेते एकत्र भेटलो. चांगल्या गप्पा झाल्या. मी हेच सांगितलं की महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कोरोनाचा सामना केला. यापुढे हे संकट काय? जगावर कोरोनाचं संकट असताना आम्ही लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा, एक चांगला कार्यक्रम दिला. त्या संकटापुढे हे संकट काहीच नाही. तसंच आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार का? असा प्रश्न विचारला असता आम्ही आता बऱ्याच दिवसांनी भेटलोय. एकत्र भेटून बरं वाटलं. आम्ही फुटलेलो नाही. पुढे काय करायचं ते लवकरच ठरवू आणि तुम्हाला सांगू, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
राज्यातील सत्तासंघर्षाबाबत विचारलं असता मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, कारण ती सर्वांना समान न्याय देते. पण जनता उघड्या डोळ्यांनी पाहतेय. न्यायदेवता आणि जनता हे आपले दोन आधारस्तंभ जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत देशात लोकशाही जिवंत राहील, बेबंदशाही येऊ देणार नाही, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिंदे आणि फडणवीस सरकारवर जोरदार टीका केलीय. या सरकारचं पायगुणच चुकीचं पडलं आहे. हे सरकार गुर्मीत वागतेय. असं सरकार टिकू शकत नाही. पक्षांतर विरोधी कायद्यात हे सरकार टिकणार नाही. एकजुटीने लढायचं या बैठकीत ठरल्याचं पटोले यांनी यावेळी सांगितलं.