Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक, तर देवेंद्र फडणवीस दिल्लीहून मुंबईत दाखल
उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोल सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरुय. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलीय. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठा भूकंप झालाय. अशास्थितीत उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोल सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरुय. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलीय. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील सत्ता नाट्य आता अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज्य मंत्रिमंडळाकडून मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी या बैठकीत सर्व मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. तुम्ही जी भूमिका घ्याल ती मान्य असेल असे त्यांनी सांगितले. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे. सरकार-प्रशासन चालू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे सरकार सुरु आहे, हे दाखवण्याचा हा प्रयत्न मानण्यात येतो आहे. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री राजीनामा देतील अशी चर्चा व्यक्त करण्यात येत होती. मात्र राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी असे पाऊल उचलू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती आहे. विश्वासदर्शक ठराव होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी धीर धरावा असंही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याचं बोललं जात आहे.
फडणवीस मुंबईत दाखल, ‘सागर’ बंगल्यावर खलबतं
दुसरीकडे भाजपच्या गोटात जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तातडीने ते मुंबईत दाखल झाले आहेत. फडणवीस मुंबईत दाखल होण्यापूर्वीच भाजप नेते फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे सागर बंगल्यावर आता भाजप नेत्यांमध्ये काय चर्चा होते? भाजपची पुढची रणनिती काय राहणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.