मी दोन भावांच्या कात्रीत सापडलो होतो : उद्धव ठाकरे
एकाने जाहीर सभेत लहान भाऊ म्हटलं, तर दुसऱ्याने मोठा भाऊ बनवलं. मात्र, मी या दोन भावांच्या कात्रीत सापडल्याचं मत मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे (Uddhav Thackeray on Narendra Modi).
मुंबई : एकाने जाहीर सभेत लहान भाऊ म्हटलं, तर दुसऱ्याने मोठा भाऊ बनवलं. मात्र, मी या दोन भावांच्या कात्रीत सापडल्याचं मत मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे (Uddhav Thackeray on Narendra Modi). सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभांमध्ये तुम्हाला छोटा भाऊ म्हटलं, तर देवेंद्र फडणवीस तुमचा उल्लेख माझे मोठे भाऊ असाच करत होते. मग काय झालं असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “मी दोन भावांमध्ये मी कात्रीत पकडलो गेलो होतो. शिवसेना ही महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या न्यायहक्कासाठी, मराठी माणसासाठी जन्माला आली. त्यानंतर शिवसेना प्रमुखांना जेव्हा लक्षात आलं की देशात हिंदूंवर गंडांतर येतं आहे तेव्हा शिवसेना प्रमुखांनी हिंदूत्वाचा अंगिकार केला. त्यानंतर शिवसेना आणि भाजपसोबत आले. हिंदुत्वावर एकत्र आलो होतो आणि आमच्या हिंदुत्वात वचन देणं आणि ते पाळणं याला अत्यंत महत्व आहे. ते जर मोडलं जात असेल, तर ते हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही.”
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला, “लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे हे एक स्पष्ट चित्र होतं. तशी आपण तयारीही केली. त्यानंतर अचानक अमित शाह तुम्हाला भेटायला आले आणि तुम्ही अमित शाहांच्या प्रचंड प्रेमात पडला हे देशानं पाहिलं.” यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “जे करायचं ते दिलखुलास करायचं. चोरुन मारुन करायचं नाही. त्या काळात ते समोरुन आले. मलाही वाटलं आपली वर्षानुवर्षाची युती आहे. पिढी बदलली. त्यामुळे कदाचित थोडं इकडंतिकडं झालं असेल. मात्र, पुन्हा संबंध सुधारत असतील आणि उद्दिष्ट-ध्येय एक असेल तर नवे मार्ग शोधण्यापेक्षा झालं गेलं विसरून नवी सुरुवात करायला हरकत नाही.”