मातोश्रीच्या मिठाला न जागणाऱ्याने 10 रुपयांच्या थाळीबद्दल शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा राणेंवर प्रहार
“मातोश्रीच्या मिठाला न जागणाऱ्याने 10 रुपयाच्या थाळीबद्दल शिकवू नये” अशा प्रहार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार नारायण राणे (Uddhav Thackeray Kankavli) यांच्यावर केला.
सिंधुदुर्ग : “मातोश्रीच्या मिठाला न जागणाऱ्याने 10 रुपयाच्या थाळीबद्दल शिकवू नये” अशा प्रहार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार नारायण राणे (Uddhav Thackeray Kankavli) यांच्यावर केला. “तू मातोश्रीच्या मिठाला जागला नाहीस. 10 रुपयात थाळी मातोश्रीवर बनवून देणार म्हणून तू काय सांगतोस?” असा टोलाही उद्धव ठाकरेंनी राणेंना लगावला. कणकवलीत आयोजित केलेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंना लाथ मारुन बाहेर काढलं म्हणून शिवसेना मोठी झाली. ते काँग्रेसमध्ये गेल्यावर मी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी शुभेच्छा दिल्या होत्या. आता भाजपला राणेंच्या पक्षप्रवेच्या शुभेच्छा देतो”, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला.
“रामायणातले राक्षस मायावी रूप धारण करायचे. तसेच हे आहेत. आधी शिवसेना, त्यानंतर काँग्रेस, मग स्वत:चा पक्ष आणि आता भाजप” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी राणेंना राक्षसाची उपमा दिली. “करून करून भागले आणि देव पूजेला लागले. देवपूजा करताना ज्यांनी चपला काढल्या नाहीत असे लोक देवपूजेला लागली कशी ? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित (Uddhav Thackeray Kankavli) केला.
“21 तारखेला संपूर्ण कोकण भगवा करणार अशा निश्चयाने तुम्ही आलात म्हणून तुम्हाला धन्यवाद. कणकवलीमध्ये मी आपल्या अधिकृत उमेदवाराला जिंकवण्यासाठी आलो आहे. संपूर्ण महाराष्ट्र भगवा होणार असे चित्र आपल्याला दिसत आहे.” असेही ते म्हणाले.
“जर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षातला एखादा चांगला उमेदवार दिला असता, तर मी त्यांच्याही प्रचाराला आलो असतो,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“कोकणातली जनता ही भोळी भाबडी आहे आणि कोणाचही वाईट चिंतणारी नाही अशी ही जनता आहे. विनायक राऊत आणि वैभव कदम यांनी यांची गुंडागर्दी मोडून काढली आहे. ही पाठीमागे वार करण्यारी अवलाद आहे हे माझ्याकडे तर नको, पण माझ्या मित्राकडे सुद्धा नको हे सांगण्याचे काम मी करत आहे. म्हणून मी भाजपला सावध करायला आलो आहे. आपले सरकार येणार आहे. तुम्ही गाढलेली भूत का काढतं आहात, या भुतांना बाहेर नाही काढल तर ही तुमच्या मानेवर बसल्याशिवाय राहणार नाही”, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला.
“सत्तेचा माज आहे. आज स्वाभिमान हा शब्द खूप आनंदीत झाला असेल कारण, मला इतका दिवस काळिमा लागला होता. इकडे वाकवा मान तिकडे वाकवा आणि म्हणे स्वाभिमान,” असा टोलाही उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना लगावला.