‘बाबरी मस्जिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती, आता भाजप पैसै मागण्यासाठी रस्त्यावर’, मुख्यमंत्र्यांचा जोरदार टोला
रामाच्या नावानं काही लोक घरोघरी पोहोचत आहेत, पण पैसै मागण्यासाठी. आपल्याला तसं करायचं नाही. राज्यातील तळागाळातला माणूस हा तुमच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना केली आहे.
मुंबई : राम मंदिर निर्माणासाठी देशभरात भाजपकडून निधी संकलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. रामाच्या नावानं काही लोक घरोघरी पोहोचत आहेत, पण पैसै मागण्यासाठी. आपल्याला तसं करायचं नाही. राज्यातील तळागाळातला माणूस हा तुमच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना केली आहे.(Uddhav Thackeray criticizes BJP’s fund raising program for Ram Mandir)
मुंबईतील वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची पॉवरफुल बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे बडे मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच बडी बैठक होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. बाबरी मस्जिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती. पण आता भाजप पैसे मागण्यासाठी रस्त्यावर आली असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. राम मंदिराच्या निधी संकलनाच्या भाजपच्या कार्यक्रमाबाबत बोलताना ‘देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय.
‘पाकिस्तान, बांग्लादेशात सत्ता स्थापन करुन दाखवा’
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या शेजारी देशांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार करायचा आहे, असं वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केलं होतं. त्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधलंय. नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करणार असं म्हणतात. हिम्मत असेल तर पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये सत्ता स्थापन करुन दाखवा. मग आम्ही तुमचं स्वागत करु, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे.
‘..तर आत वेगळी परिस्थिती असती’
दुसऱ्या राज्यांमध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणावर होती. पण त्यावेळी शिवसेनेनं निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेचे अनेक लोक भाजपमध्ये गेले. त्यावेळी शिवसेनेनं अन्य राज्यांमध्येही निवडणूक लढवली असती तर आज वेगळी परिस्थिती असती, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला आहे.
शिवसंपर्क अभियानाची घोषणा
शिवसेनेनाही राज्यभरात ‘शिवसंपर्क’ अभियान राबवणार आहे. तशी माहिती शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. गावोगावी शिवसेना पोहोचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान राबवलं जाणार आहे.
संबंधित बातम्या :
शिवसेना गावागावात पोहोचवा, पॉवरफुल बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश
Uddhav Thackeray criticizes BJP’s fund raising program for Ram Mandir