बॉम्ब, वाती, अन् पेटवापेटवी, महाराष्ट्राच्या राजकारणात ‘बॉम्ब’वॉर!, ठाकरे-फडणवीस आमने-सामने…
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 'बॉम्ब'वॉर सुरु आहे. दोन्ही बाजूने 'बॉम्ब'च्या तोफा डागल्या जात आहेत. पाहा...
नागपूर : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होतेय. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात ‘बॉम्ब’वॉर सुरु आहे. आधी उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे अनेक बॉम्ब असल्याचं सांगितलं. आता त्याला फडणवीस यांनी उत्तर दिलंय.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
आमच्याकडे तर बरेच बॉम्ब आहेत. या बॉम्बच्या वातीही काढलेल्या आहेत. फक्त त्या वाती पेटवायचा अवकाश आहे. योग्य वेळी बॉम्ब फोडणार, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
फडणवीस काय म्हणाले?
शूट अॅण्ड स्कूट अशी ही निती आहे. कुठलंही प्रकरण उकरून काढायचं. त्यावरून गोंधळ घालायचा. मग आम्ही उद्दर देत असू तर ते घ्यायचं नाही. अशा प्रकारचा ठाकरेगटाचा प्रयत्न दिसतोय. आतापर्यंत तरी ते जे बॉम्ब म्हणत आहेत. ते लवंगी फटाके देखील नाहीयेत. आमच्याकडे खूप बॉम्ब आहेत. कधी काढायचे ते ठरवू. पण सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत ते आम्ही बघू, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
संजय राऊत नागपुरात आले आहेत. म्हटले बॉम्ब फोडणार आहे पण अजूनपर्यंत तरी काय दिसला नाही. महाराष्ट्राची एक इंचही जागा आम्ही कर्नाटक सरकारला देणार नाही. अब्दुल सत्तार आणि संजय राठोड आरोपांबाबत सभागृहात निर्णय होईल, असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी राऊतांवर टीका केली आहे.
तर संजय राऊत बॉम्बस्फोट करता हीच एक मोठी बातमी आहे. त्यांनी रात्री चणे जास्त खाल्ले असतील त्याचा स्फोट होऊ नये म्हणजे झालं, असं संजय शिरसाठ म्हणालेत.
संजय राऊत यांनी बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आज ते नागपुरात आहेत. त्यामुळे ते आज काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे.