‘त्या’ पत्राची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली नाही; म्हणून आम्ही उठाव केला, प्रताप सरनाईकांनी सांगितलं कारण
आपली मंत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यांनी हा विचार करावा की आम्ही बाहेर का पडलो, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन का जात आहोत, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
मुंबई : बुधवारी बेकेसीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दसरा मेळावा पार पडला. तर दुसरीकडे शिवाजी पार्कवर शिवसेना (Shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा झाला. दोन्ही गटाकडून एकोमेंकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंचे सर्व आरोप खोडून काढत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही बाहेर का पडलो? बाळासाहेबांचे विचार घेऊन का पुढे जात आहोत? याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटले सरनाईक?
आपली मंत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यांनी हा विचार करावा की आम्ही बाहेर का पडलो, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन का जात आहोत.
मी 9 जून 2021 रोजी त्यांना एक पत्र पाठवलं होतं. मी त्या पत्रात म्हटलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू आहे. मात्र माझ्या त्या पत्राची दखल घेण्यात आली नाही. त्यानंत हा उठाव झाल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
कोणताही मेळावा खर्चाशिवाय होत नाही
सध्या शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यावर केलेल्या खर्चाची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांना विचारले असता त्यांनी म्हटलं की, कोणताही मेळावा हा खर्चाशिवाय होत नाही. आमच्याकडे 40 आमदार आहेत, 12 खासदार आहेत, असंख्य कार्यकर्ते आहेत या सर्वांनी मिळून हा खर्च केला आहे. शिवाजी पार्कवर झालेला मेळाव्यासाठी खर्च झालाच नाही का असा सवालही सरनाईक यांनी उपस्थित केला आहे.