Uddhav Thackeray : बहुमत चाचणीपर्यंत धीर धरा, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला; राज्यातील सत्ता नाट्य अजून लांबणार?
उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती देण्यात येतेय. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई : राज्यातील राजकारणात आज मोठी घडामोड घडणार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आजची मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री म्हणून शेवटची असणार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अशा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशावेळी अजून एक महत्वाची बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीपर्यंत धीर धरा असा सल्ला दिल्याची माहिती मिळतेय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती देण्यात येतेय. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
उद्धव ठाकरे हे पक्षातील बंडाळीनंतर दोन वेळा राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं असं बोललं जातं. मात्र, आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. दुपारी अडीच वाजता मंत्रिमंडळ बैठकीची वेळ होती. त्यानंतर ती संध्याकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या बैठकीत सरकार बरखास्तीबाबत चर्चा होईल असं सांगितलं जातंय. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशीही दाट शक्यता असल्याचं बोललं जात होतं. मात्र शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या फोननंतर उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.
उद्धव ठाकरे यांचं बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
‘समोर येऊन बोला आपण मार्ग काढू’
आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असं भावनिक आवाहनही ठाकरे यांनी केलं आहे.