मनोमिलनानंतरही उद्धव ठाकरेंना दगाफटक्याची भीती?
नागपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मनोमिलनानंतर दगाफटक्याची भीती आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण युतीच्या अमरावती आणि नागपूर या मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरे यांची विधानं प्रश्न उपस्थित करणारी आहेत. मनोमिलन झालं का? अशी दोन वेळा विचारणा त्यांनी कार्यकर्त्यांना केली. शिवाय धनुष्यबाण आणि कमळ हेच युतीचे उमेदवार आहेत, त्यामुळे तिसऱ्या कुणाला निवडू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरे […]
नागपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मनोमिलनानंतर दगाफटक्याची भीती आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण युतीच्या अमरावती आणि नागपूर या मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरे यांची विधानं प्रश्न उपस्थित करणारी आहेत. मनोमिलन झालं का? अशी दोन वेळा विचारणा त्यांनी कार्यकर्त्यांना केली. शिवाय धनुष्यबाण आणि कमळ हेच युतीचे उमेदवार आहेत, त्यामुळे तिसऱ्या कुणाला निवडू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.
उद्धव ठाकरे यांचे प्रश्न म्हणजे भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करताना, तिसऱ्या पर्यायाचा विचार करु नका, असे थेट सल्ले होते. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना भाजपकडून दगाफटक्याची भीती आहे का असा प्रश्न आहे.
दरम्यान नागपूरमध्ये झालेल्या युतीच्या संमेलनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.
‘सुजय विखे पाटील यांना घेतलं, आता राज्यात टीका करायला विरोधक असूद्या, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना तरी भाजपात घेऊ नका, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या संमेलनात भाजपला लगावला. तर विरोधकांकडे मुद्दे नाहीत, कॅप्टन नाही, प्रत्येकांना वाटतं बारावा खेळाडू व्हावं, कुणी निवडणूक लढवायला तयार नाही’ असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार यांच्यावर सडाडून टीका केली.
मनोमिलन झालं का?
मनोमिलन झालं का? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या कार्यकर्त्यांना हा प्रश्न विचारत, शिवसेना आणि भाजप कार्यकर्तांच्या मनोमिलनाची खात्री करुन घेतली. गेल्या साडेचार वर्षातला शिवसेना भाजपमधला संघर्ष दुर्दैवी होता. याची कबुली देत फक्त विदर्भात दहाही जागा नाही तर महाराष्ट्रातील 48 जागाही युतीनं जिंकाव्यात, असा आशावाद नागपुरातील युतीच्या संमेलनात उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मनोमिलन झालं का असा प्रश्न विचारला. हाच प्रश्न त्यांनी अमरावतीतही विचारला होता. धनुष्यबाण आणि कमळ हेच युतीचे उमेदवार आहेत, त्यामुळे तिसऱ्या कुणाला निवडू नका, असं आवाहन उद्धव यांनी युतीच्या कार्यकर्त्यांना केलं. तर आमच्याकडे डोळे मारुन काम करणारे नाहीत, असं म्हणत दगाफटका होण्याची भीतीही त्यांच्या मनात दिसली.
नाणार प्रकल्प रद्द केला, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले, राज्यात विकास केला, त्यामुळेच मी युती केली, मी काही मूर्ख नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. युतीची घोषणा झाल्यानंतर काल पहिल्यांदा भाजपचा गड असलेल्या विदर्भात युतीच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन करण्याचा प्रयत्न झाला. पण आता लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या जागावाटपानंतर असंच मनोमिलन कायम राहणार का? हाच खरा प्रश्न आहे.
पाकिस्तानमध्ये खेळाडू पंतप्रधान झाला, पण आपल्या देशात पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणारे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली. राज्यात टीका करायला कुणाला तरी राहू द्या शरद पवारांना भाजपात घेऊ नका, असा टोलाही उद्धव यांनी भाजपाला लगावला.
मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका
नागपुरातील युतीच्या संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. विरोधकांकडे मुद्दे नाहीत, त्यांच्याकडे कॅप्टन नाही, निवडणूक लढवायला तयार होत नाही, त्यांना बारावा खेळाडू व्हायचं आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली. सत्तेत आल्यास विरोधक इतिहास बदलतील, असं म्हणत गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही विदर्भातली मॅच 10-0 ने जिंका म्हणजे विदर्भातील लोकसभेच्या दहाही जागा निवडून आणा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी युतीच्या कार्यकर्त्यांना केलं.
पवार हुशार, पराभवाच्या भीतीने माघार – गडकरी
गेल्या पाच वर्षांत केलेलं काम फक्त ट्रेलर होतं, पूर्ण पिक्चर बाकी आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. शरद पवार हुशार राजकारणी आहेत, पराभव होणार हे त्यांना माहित होतं, म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं गडकरी म्हणाले.