Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आजच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या 2 महत्त्वाच्या शक्यता
Uddhav Thackeray Floor Test : राजकीय जाणकारांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार, उद्धव ठाकरे हे राजकीय पेच दूर व्हावा, यासाठी आधीच राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Floor Test) यांना राज्यपालांनी (Governor Bhagatsingh Koshyari) बहुमत सिद्ध करण्याचं पत्र पाठलंय. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. याबाबतच्या दोन महत्त्वाच्या शक्यता सांगितल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून उद्या विशेष अधिवेशन (Special Maharashtra Assembly Session) बोलवण्याबाबत विचारणा राज्यपालांनी केलेली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंगळवारी रात्री उशिरा भेट घेतली होती. राज्यातील सरकार अल्पमतात असल्याबाबत त्यांनी माहिती दिली होती. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकारमध्ये सत्ते राहण्यावर आक्षेप असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान आहे. शेवटच्या क्षणापर्यंत खरंतर लढणार आहे, अशी भूमिका मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मविआने घेतली होती. सर्व अधिकारही मुख्यमंत्र्यांना कॅबिनेटने दिल्याची माहिती दिली आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या अग्निपरीक्षेला सामोरं जाण्याआधी मुख्यमंत्रीपदावरुन उद्धव ठाकरे पायउतार होणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. याच पार्श्वभूमीवरच्या दोन शक्यता जाणून घेऊयात..
1 नैतिकदृष्ट्या राजीनामा :
राजकीय जाणकारांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार, उद्धव ठाकरे हे राजकीय पेच दूर व्हावा, यासाठी आधीच राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. त्याचा विचार लक्षात घेता उद्धव ठाकरे हे नैतिकदृष्ट्या राजीनामा देऊ शकतात, असंही सांगितलं जातं. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर सरकार कोसळेल आणि नव्यानं सत्ता स्थापनेचा दावा हा राज्यपालांकडे केला जाऊ शकतो. मात्र असं झाल्यास विशेष अधिवेशनातील अग्निपरीक्षा टळेल.
2 सरकार अल्पमतात :
मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत लढण्याचा निश्चय केला होता. वेळोवेळी बहुमत चाचणीला सामोरं जाण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशा आशयाची वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांकडून केली जात होती. स्वतः उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलेलं होतं. सभागृहात माझ्याविरोधात माझ्याच माणसांकडून मतदान होणं ही माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट असेल, असंही ते म्हणाले होते. त्याआधीच मी राजीनामा देतो, असं ते म्हणाले होते.
मात्र त्यानंतर बंडखोर आमदार आणि शिवसेना नेत्यांमधील संघर्ष ताणला गेला. प्रखर वक्तव्य केली होती. चर्चा फिस्कटलेली. त्यानंतरही बहुमत चाचणीला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारनं घेतली होती. त्यामुळे शेवटपर्यंत संघर्ष करुनही जर बहुमत सिद्ध करता आलं नाही, तर सरकार कोसळलणार आहे. पर्यायानं उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागेल.
आता कसं आहे पक्षिय बलाबल?
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |