उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंचा राजकीय गेम केलाय; आमदार संजय गायकवाड यांच्या आरोपानंतर ठाकरेंचा जबरदस्त प्लान
उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काही संबंध नव्हता..संबंध होता बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंचा
मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंचा राजकीय गेम गेल्याचं वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केले आहे. उद्धव ठाकरे 2003 साली शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले. त्यावेळी महाबळेश्वरच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव मांडला होता.
उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काही संबंध नव्हता. संबंध होता बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंचा. मी 86 पासून सैनिक आहे. त्यावेळी बाळासाहेबांची ओपन बायपास झाली. त्यांची पत्नी वारली, मुलगा वारला. बाळासाहेब एकाकी पडले.आतंकवाद्यांच्या धमक्या असूनही त्यांना झेड प्लस सेक्युरिटी नाही दिली. त्यांच्या सगळ्यांच्या भेटी बंद झाल्या.
हे सगळं बाळासाहेबांचं पाहून उद्धव ठाकरेंना वाटलं, आता आपणही राज्याचं मुख्यमंत्री झालं पाहिजे. मग त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिला शिवसेनेचा कार्याध्यक्ष निवडायचा होता, निवडणूक आयोगानं सांगितले. सगळ्यात मोठी अडचण होती राज ठाकरे.
मग प्लॅनिंग झालं. मनोहर जोशीच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं, राज ठाकरेंच्या कानात, की राज ठाकरे, तू उद्धव साहेबांचं नाव सूचव अशी बाळासाहेबांची इच्छा आहे.
मग बाळासाहेबांना राज ठाकरे क्रॉस करु शकत नव्हते, राज ठाकरेंनी उठून सांगितलं की उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करा काही संबंध नसताना आणि उद्धव ठाकरेंनी पहिला गेम केला तिथे राज ठाकरेंचा.
आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंवर आणखी एक आरोप केलाय.. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता तर त्याचवेळी भाजपला का विचारलं नाही असं गायकवाड म्हणाले.
सातत्यानं आरोप करणाऱ्या संजय गायकवाड़ांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडूनही जोरदार हालचाली सुरु आहेत. शिवसेनेकडून 3 वेळा आमदार राहिलेले आणि सध्या भाजपात असलेले विजयराज शिंदे उद्धव ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत.
2019 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेले विजयराज शिंदे ठाकरे गटात आल्यास ताकद वाढणार आहे. थेट उद्धव ठाकरेंवरच आरोप करणाऱ्या संजय गायकवाड यांची राजकीय कोंडी करण्याचा हा ठाकरेंचा प्रयत्न आहे.