सुट्टी असली तरी आमदार राजन साळवी यांची चौकशी होणार, चौकशीकडे सर्वांचे लक्ष
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने वरळी डोम थिएटर येथे महापत्रकार परिषद घेऊन या निकालाची चिरफाड केली. त्यानंतर शिवसेना नेत्यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यात ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आमदार रवींद्र वायकर, राजन साळवी, किशोरी पेडणेकर यांना टार्गेट केले आहे.
मनोज लेले, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, रत्नागिरी | 21 जानेवारी 2024 : एकीकडे अयोध्येत उद्या श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. त्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील अनेक राज्य सरकारनेही सुटी जाहीर केली आहे. तरीही शिवसेना उद्धव गटाचे आमदार राजन साळवी यांची 22 जानेवारीला सुटीच्या दिवशीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाणार आहे. राजन साळवी यांची यापूर्वीही चौकशी झाली आहे. त्यांच्या बॅंक खात्याची तपासणी देखील करण्यात आली आहे. उद्या 22 जानेवारीला राजन साळवी आपल्या भावासह चौकशीसाठी सातव्यांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर होणार आहेत.
उद्धव ठाकरे गटातील कोकणातील आमदार राजन साळवी यांच्या घरावर गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून चौकशी सुरु केली. राजन साळवी यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एसीबीने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत साळवी यांची चौकशी केली होती. सोमवारी 22 जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त सुट्टी जाहीर केली असली तरी आमदार राजन साळवी यांची चौकशी होणार आहे. एसीबी कार्यालयात राजन यांची चौकशी होणार आहे. सुट्टी जाहीर होण्यापूर्वीच राजन साळवी यांना नोटीस दिल्याने ही चौकशी त्याच दिवशी करावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जोरदार शक्ती प्रदर्शन
राजन साळवी त्यांच्या भावासह सातव्यांदा एसीबी कार्यालयात चौकशीसाठी होणार हजर होणार आहेत. दुपारी बारा वाजता राजन साळवी आणि त्यांच्या भावाची रत्नागिरी एसबी कार्यालयात चौकशी होणार आहे. जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते साळवी यांच्या समर्थनार्थ रत्नागिरीत होणार दाखल होणार आहेत. यानिमित्याने ठाकरे गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे.