40 आमदार गेले 15 राहिले उद्धव ठाकरे यांनी चिंतन करावं; सत्तार यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा
आज उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. ते मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत. यावरून राजकारण चांगलच तापलं आहे.
औरंगाबाद : आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. ते मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकोंमेकांवर आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. जर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सत्तार यांनी नेमकं काय म्हटलं?
उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये आवश्य यावं, त्यांचं स्वागतच आहे. त्यांनी इथे येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यावेत. त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांचे प्रश्न मांडावेत. मात्र ते जर इथे केवळ राजकारण करण्यासाठी येत असतील तर शेतकरी त्यांना त्याचं उत्तर देतील. ते त्य़ांना जिल्हा परिषद निवडणुकीतून दिसून येईल असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना सत्तार यांनी म्हटलं आहे की, एकवेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे 55 आमदारांची फौज होती. मात्र त्यातले 40 निघून गेले आहेत. आता त्यांच्याकडे 15 आमदार शिल्लक आहेत. ते तरी त्यांनी निट सांभाळले पाहिजेत. 40 आमदारांनी आपल्याला का सोडलं याचं त्यांनी चिंतन करावं. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. याला देखील सत्तार यांनी उत्तर दिले आहे. राज्यात सध्या तरी तशी परिस्थिती नाही, निर्माण झाल्यास आवश्य जाहीर करू असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
राजू शेट्टी यांना टोला
राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवरून सत्तार यांच्यावर निशाणा साधला होता. पन्नास हजार रुपये हे पन्नास खोक्यांपेक्षा कमीच आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. सत्तार यांनी यावेळी राजू शेट्टी यांच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले आहे. ज्या लोकांची दुकानं बंद होतात ते लोक नवीन दुकानं उघडतात असं सत्तार यांनी म्हटलं आहे.