“एकनाथ शिंदे संघाचं मुख्यालय ताब्यात घेण्यासाठी गेले होते का?”, उद्धव ठाकरेंचा सवाल
पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. पाहा काय म्हणालेत....
नागपूर : विधिमंडळाचं अधिवेशन होत आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या आधिवेशन काळात काय-काय घडलं? याचा आढावा घेणारी पत्रकार परिषद उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतली. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावरही ठाकरेंनी टीका केलीय.
सध्या महाराष्ट्रात टोळीचं राज्य आहे. त्यांनी याआधीच पक्ष चोरलाय. दुसऱ्याचे वडील चोरलेत. या टोळीची नजर सध्या संघाच्या कार्यालयावर पडली आहे. त्यामुळे RSS ने आता वेळीच सावध व्हावं. आज शिंदे रेशीमबागेत येऊन गेलेत. तिथे लिंबू-टाचण्या कुठे पडल्या आहेत का ते पाहावं, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
“एकनाथ शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय ताब्यात घेण्यासाठी गेले होते का?”, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची भाषा भाजप आधीपासूनच करत आहे. कर्नाटकच्या भाजपच्या मंत्र्यानेच हा डाव जगासमोर उघड केला. त्यांच्या एका वक्तव्यातून भाजपच्या पोटातलं ओठावर आलं, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आपला नेता मानतात. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील त्यांनाच आपला नेता मानतात. त्यामुळे एका राज्याचा प्रमुख दुसऱ्या राज्याविषयी आक्षेपार्ह बोलत असले. तर केंद्रीय नेतृत्वाने त्याची दखल घ्यायला हवी. त्यांना समज द्यायला हवी. पण तसं होताना दिसत नाहीये, असं ठाकरे म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे बोलत आहेत. पण आपलं राज्यातील नेतृत्व महाराष्ट्र कर्नाटक प्रश्नाबाबत ठाम भूमिका घेताना दिसत नाहीये. हे गंभीर आहे. आपली भूमिका काय हे त्यांनी एकदा स्पष्ट करायला हवं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.