Udhav Thackeray : मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत उद्धव ठाकरे? सर्व शिवसैनिकांना सेना भवनला जमण्याचे आदेश
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी शिवसैनिकांना सेनाभवनासमोर जमण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई : आज राज्याच्या राजकारणासाठी मोठा दिवस आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याने शिवसेनेच्या (Shiv Sena) गोटात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी सर्व शिवसैनिकांना सेना भवनला जमण्याचे आदेश दिले आहेत. थोड्याच वेळात शिवसैनिक सेनाभवनसमोर जमा होणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कडक भूमिका घेतली असून, त्यांना विधानसभेच्या गटनेते पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे सध्या सुरतमध्ये आहेत. शिंदे यांच्या संपर्कात 35 आमदार असल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे. हे आमदार अमित शाह यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळत आहे.
दिल्लीच्या राजकारणातील घडामोडींना वेग
दरम्यान महाराष्ट्रात आज घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या राजकारणातील हालचालींना देखील वेग आला आहे. आज जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आज सकाळीच दिल्लीत पोहोचले होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हाव आणि आपण उपमुख्यमंत्री व्हाव अशी इच्छा देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
एकनाथ शिंदेंच ट्विट
या सर्व घाडमोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट देखील केले आहे. हे ट्विट अवघ्या काही मिनिटांमध्ये व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख केला आहे. मात्र या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख टाळला आहे. ”आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही ” असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. याचाच अर्थ आता एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेसाठी आघाडी करण्यास इच्छुक नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.