भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल संसदेत बोलताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीने उल्लेख केला, त्यावरुन आता महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. आज त्याच संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. “गेले अडीच तीन वर्ष त्याही आधीपासून सातत्याने पाहत आहोत. भाजपा आणि त्यांचे उमर्ट नेते महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा, महाराष्ट्रातल्या देवतेंचा ज्या प्रकारे अपमान करत आहे, तो अपमान आता सहनशीलतेपलीकडे गेला आहे. जेव्हा कोशयारी नावाचे गृहस्थ राज्यपालपदी बसवलं त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाच्या वयावरुन अपमान केला होता. विचित्र टिप्पणी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. आम्ही मोर्चा जरुर काढलेला. पण भाजपने ना त्यांच्याकडून माफी मागून घेतली किंवा दूर केलं. मधल्याकाळात घाईघाईन छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा बसवताना त्यात भ्रष्टाचार केला. तो पुतळा आठ महिन्यात पडला. त्यानंतर काय घडलं तुम्हाला कल्पना आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्र जणू काही गांडुळांचा प्रदेश आहे, असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटायला लागलय. महाराष्ट्रातले उद्योग ओरबाडून गुजरातला नेत आहेत. आता कहर झाला. काल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत उमर्टपणाने देशातली घटना, संविधान ज्यांनी लिहिल त्या महाराष्ट्राच्या सुपूत्राचा महाराष्ट्राच्या, देशाच्या महामानवाचा ज्या प्रकारे उल्लेख केला. आंबेडकर फॅशन झाली त्या ऐवजी देवाचं नाव घेतलं असतं, तर सात जन्माच पुण्य लाभल असतं असा अत्यंत हिणकस उद्दाम उल्लेख केला. मला वाटतं भाजपचा बुरखा फाटला आहे. भाजपच ढोंग समोर आलेलं आहे” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
मिंधे, अजित पवारांना बाबसाहेबांचा अपमान मान्य आहे का?
“यांना महाराष्ट्र खतम करायचा आहे. नेहरु नेहरु करता करता आंबेडकरांवर बोलायला लागले, एवढी याची हिम्मत वाढली. आता मला जे, भाजपला पाठिंबा देणारे इतर पक्ष आहेत, नितीश कुमार, चंद्राबाबू विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतात ? रामदास आठवले राजीनामा देणार का? महाराष्ट्रात भाजपसोबत जे आमचे मिंधे, अजित पवार गेलेत, त्यांना बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का? ते कळलं पाहिज” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
संघाने खुलासा करावा
“महाराष्ट्र सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला आहे. संघाने खुलासा केला पाहिजे, हे तुम्ही अमित शाहंकडून बोलून घेतलय का? आता बाबासाहेबांचा असा उल्लेख केल्यावर भाजप अमित शाहंवर काही कारवाई करणार आहे की नाही? भाजपच ढोंग बाहेर पडलं आहे. आता महाराष्ट्राने, देशाने शहाणं झालं पाहिजे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
…तर मोदींनी सत्तेवर राहू नये
“ससंदेत संविधानावर चर्चा सुरु आहे. ज्यांनी संविधान आपल्याला दिलं, त्या आंबेडकरांबद्दल, बाबासाहेबांबद्दल अमित शाहसारखा एखादा माणूस तुच्छेने बोलू कसा शकतो? याचं उत्तर मिळालं पाहिजे. भाजपला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. घटनाकारांचा अपमान करणाऱ्यांना अभय देणार असतील, तर मोदींनी सत्तेवर राहू नये, मोदींनी अमित शाहंवर कारवाई करावी” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे भाजपच्या मनातलं काळं
“महाराष्ट्र काही करुन शकत नाही, अशा मस्तीत हे वागू लागले आहेत. आंबेडकरांच, महाराष्ट्राच नाव पुसायला निघालेले आहेत. हे भाजपच्या मनातलं काळं आहे. संघाने आणि भाजपने बोलल्याशिवाय ते असं बोलू शकत नाहीत. संसदेत बोलतान फार जबाबदारीने बोलावं लागत” असं उद्धव ठाकरे म्हणाले. पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारलं की, पंतप्रधान मोदी म्हणतायत की, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “दुसऱ्याने शेण खाल्ल म्हणून तुम्ही शेण खाणार का? अमित शाह काय बोलले त्यावर बोला”