…तर गुन्हा दाखल झाला असता का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल
"क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री झाला, त्यांना जनतेच्या भावनेशी खेळता येतं. गद्दार व्यक्ती मुख्यमंत्री झाली हे दुर्देव आहे", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
Badlapur School Rape Case : बदलापूरमध्ये दोन शालेय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास 12 तास उशीर केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटले. या प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. “क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री झाला, त्यांना जनतेच्या भावनेशी खेळता येतं. गद्दार व्यक्ती मुख्यमंत्री झाली हे दुर्देव आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी बदलापूर घटनेबद्दल भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांचेही कौतुक केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांवरही टीका केली.
“गद्दार व्यक्ती मुख्यमंत्री झाली”
“गिरीश महाजनांबद्दल काय बोलायचं? मी त्या विषयाला फाटे फोडत नाही. त्यांनी म्हटलं फाशी दिली गेली. त्याबाबत एसआयटी नेमा. कोणता प्रसंग होता त्याची चौकशी करा. कुणाला फास्ट ट्रॅक चालवून फाशी दिली त्याची चौकशी करा. त्याची चौकशी करण्यासाठी वेगळी एसआयटी नेमा. क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री झाला आहे. त्यांना जनतेच्या भावनेशी खेळता येतं. गद्दार व्यक्ती मुख्यमंत्री झाली हे दुर्देव आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
“जनतेच्या भावनेशीही गद्दारी केली जातेय”
“जनतेच्या भावनेशीही गद्दारी केली जात आहे, याची खंत वाटते. आतातायी पाऊल उचलण्याचं काम कधी होतं, जेव्हा यंत्रणा काम करत नाही. तेव्हा पालकांची दखल घेतली असती, गुन्हा दाखल केला असता तर हा प्रसंग आला नसता. जनतेचा उद्रेक झाला तर त्यात राजकारण झालं असं म्हणणं आणि ज्यांना आंदोलन केलं त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणं असं बघितल्यावर आग लागो तुझ्या कारभाराला असंच म्हणायची वेळ येते”, असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला.
“कालचा उद्रेक हा सामूहिक”
“क्षणभर राजकीय कार्यकर्ते असतील तर काय चुकलं त्यांचं. ते उतरले नसते तर गुन्हा दाखल झाला असता का? काल सुषमा अंधारे तिथे जाऊन बसल्या म्हणून गुन्हा दाखल झाला. नाही तर तो दुसरा नालायक वामन म्हात्रे सुटलाच असता. हेच तर माझं म्हणणं आहे. जर का तुम्हाला यात राजकारण वाटत असेल, तर याचा अर्थ तुमच्या काळात गुन्हे घडत आहेत. ही शाळा आरएसएस किंवा भाजपच्या संपर्कातील व्यक्तीची आहे अशी माहिती आहे. मला माहीत नाही. पण कालचा उद्रेक हा सामूहिक आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.