Uddhav Thackeray : उपरवाले के घर देर है अंधेर नहीं, सुषामा अंधारेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा
आता सामान्य लोकांना अतिसामान्य करायचं आहे, त्यांची नसलेल्या शिवसेनेची बांधणी सुरू आहे, पण आपल्याला असलेल्या शिवसेनेची पुनर्बांधणी करायची आहे, असे आवाहनही शिवसेना कार्यकर्त्यांना केलं आहे.
मुंबई : सध्याचा काळ हा ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) अत्यंत कसोटीचा काळ आहे. उरलेली शिवसेना (Shivsena) वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. अनेक नेते रोज साथ सोडून जात आहेत. दिवसेंदिवस शिंदे गटाची (Eknath Shinde) ताकद ही वाढत चालली आहे. अशातच आता आंबेडकरी चळवळीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे. तसेच ज्यांना मोठं केलं ते निघून गेलेत. आता सामान्य लोकांना अतिसामान्य करायचं आहे, त्यांची नसलेल्या शिवसेनेची बांधणी सुरू आहे, पण आपल्याला असलेल्या शिवसेनेची पुनर्बांधणी करायची आहे, असे आवाहनही शिवसेना कार्यकर्त्यांना केलं आहे. तसेच उपरवाले के घर देर है अंधेर नहीं म्हणत शिंदे गटाला इशाराही दिला आहे.
नीलम गोऱ्हेंच्या प्रवेशाची आठवण सांगितली
शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारे यांना शिवसेनेचं उपनेते पद देण्यात आलेलं आहे, उद्धव ठाकरे यांनीच ही घोषणा केली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, नीलमताई गोऱ्हे यांचा 24 वर्षांपूर्वी मला निरोप आला की त्यांना भेटायचे आहे. त्यावेळी त्यांच्याशी 3 तास चर्चा केली. मला वाटले यांना यायचे तर नाही. मग कशाला चर्चा पण मग त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांच्या परिवर्तन होऊन त्या सेनेत आल्या, अशी नीलम गोऱ्हेंच्या पक्षप्रवेशीची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली आहे. अनेक नेत्यांनी साथ सोडली असताना आता नीलम गोऱ्हे याच ठाकरेंसोबत आहेत.
प्रतिगामी, पुरोगामी दोघांनी एकत्र यायला हवं
तसेच ही संविधानीक लढाई अशी आहे, ज्यात प्रतिगामी पुरोगामी दोघांनीही एकत्र यायला पाहीजे . कारण संविधान वाचले तर सर्व वाचतील. असे आवाहनही ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेनेच्या न्यायीक लढाईत महत्वाचा निर्णय येईल. तो देशासाठी महत्वाचा असेल. शिवसेनेत तुमचे स्वागत करतो, तुम्ही आलात, नसलेल्या शिवसेनेची बांधणी सुरू आहे. मला त्यावर बोलायचे नाही. पण आपल्या खऱ्या खुऱ्या शिवसेनेची बांधणी करूया. म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांना पक्षात प्रवेश दिला आहे. यावेळी पुरोगामी संघटनांच्या वतीने प्रबोधनकार यांची प्रतिमा देण्यात आली आहे.
सुषणा अंधारे काय म्हणाल्या?
माझं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही, असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले तेव्हाच तळागाळात विचार गेला. यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करण्याचं ठरवलं. माझ्या डोक्यावर ईडीचे ओझं नाही आहे. मी कोणत्या लोभापायी आलेली नाही. नीलम ताई माझ्या पाठीशी आहेत. माझ्याकडून चुकीचं काहीही होणार आहे. कपटी शत्रू पेक्षा दिलदार शत्रू कधीही चांगला, भाजपसोबत लढण्यासाठी आम्ही शिवसेने सोबत आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी अंधारे यांनी दिली आहे.