Narayan Rane : बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष, त्यांचे नाव, फोटो लावण्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही, उद्धव ठाकरे यांना राणेंचं काय उत्तर?
आमचं दैवत आहे आणि दैवताचं नाव घेताना उद्धव ठाकरेला विचारण्याची गरज नाही', अशा शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) पलटवार केलाय. तसंच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना मनस्ताप, त्रास दिल्याचा गंभीर आरोपही राणे यांनी पत्रकार परिषदेत केलाय.
मुंबई : हिंमत असेल तर माझ्या वडिलांचं, बाळासाहेबांचं नाव आणि त्यांचे फोटो वापरू नका, तुमच्या आई-वडिलांच्या नावाने मतं मागा, असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदारांना दिलंय. ठाकरे यांच्या या आव्हानावरुन केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय. ‘साहेबांचं नाव घेण्याचा आमचा अधिकार आहे आमचे वडील नसले तरी. आमचं दैवत आहे आणि दैवताचं नाव घेताना उद्धव ठाकरेला विचारण्याची गरज नाही’, अशा शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) पलटवार केलाय. तसंच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना मनस्ताप, त्रास दिल्याचा गंभीर आरोपही राणे यांनी पत्रकार परिषदेत केलाय.
‘दैवताचं नाव घेताना उद्धव ठाकरेला विचारण्याची गरज नाही’
‘आम्ही शिवसेना अशी आणून दिली म्हणून अडीच वर्ष बसला. आमची 50 वर्षाची मेहनत, घर पाहिलं नाही, कुटुंब पाहिलं नाही, मुलं, आई-वडील पाहिले नाहीत. पण साहेबांच्या नखालाही धक्का लागू दिला नाही. तिकडे लोणावळ्याला साहेबांच्या जीवाला धोका होता. साहेबांनी तुला बरोबर नाही घेतलं. तुझी माणसं साहेब नाही बोलले. मला साहेब म्हणाले आपल्याला जायचं आहे, अमुक वाजता ये. लोणावळ्याला जाऊन राहिलो. तुम्ही कुठे होता? रात्र जागवल्या आम्ही, साहेब बंगल्यात झोपायचे आम्ही रस्त्यावर गाडी लावून पाहारा केलाय. साहेबांचं नाव घेण्याचा आमचा अधिकार आहे आमचे वडील नसले तरी. आमचं दैवत आहे आणि दैवताचं नाव घेताना उद्धव ठाकरेला विचारण्याची गरज नाही’, असं प्रत्युत्तर राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलंय.
Interaction with Media in New Delhi. https://t.co/74pQyshxJt
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 26, 2022
उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले, राणेंचा गौप्यस्फोट
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याबाबत राणेंनी मोठा गौप्यस्फोटही केलाय. तू काय दिलं वडिलांना मनस्ताप, संताप, त्रास. त्यांचं स्वास्थ्य बिडण्याचं कारण हा उद्धव ठाकरे आहे. घरातून पळून गेला, दोन वेळा पळून गेला. विचारा त्यांना कुणी परत आणलं, या नारायण राणेने परत आणलं आणि आमचं घर तोडायला खोटे नाटे आरोप करुन. लाज वाटायला हवी’, असा हल्लाबोल राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय.
‘बाळासाहेब ठाकरे हे नाव काढलं तर उद्धव ठाकरे शून्य’
वारसा रक्तानेच असतो का? विचाराने नसतो? साहेबांचे किती विचार आत्मसात केले आणि किती आत्मसात केले सांगावं त्यांनी. साहेबांना किती प्रेम दिलं, किती सहवास दिला? त्याच्या अधिकपटीने दु:ख दिलंय, त्रास दिला. एक दिवस क्रमवार यांनी दिलेला त्रास मला सांगावा लागेल. छळलं अक्षरश: आणि आज मोठा साहेब साहेब म्हणतो. याला माहिती आहे बाळासाहेब ठाकरे हे नाव काढलं तर मोठं शून्य म्हणजे उद्धव ठाकरे, अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.