उद्धव ठाकरेंचा राइट हँड शिंदे गटात? नार्वेकरांच्या नावाची पुन्हा चर्चा, काही बिंदू जुळतायत?
शिवसेनेच्या आतील गोष्टी एवढ्या सहजा सहजी बाहेर येणं कठीण आहे. पण सध्या राजकीय वर्तुळात हे बिंदू जुळवून पाहिले जातायत.
विशाल ठाकूर, धुळेः जळगावात शिंदे गटाच्या एका मंत्र्याने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) हादरवणारं वक्तव्य केलंय. आयुष्यभर बाळासाहेब ठाकरेंची सेवा करणारे चरणसिंग थापा शिंदे गटात आले. आता मिलिंद नार्वेकरही (Milind Narvekar) शिंदे गटात येतील, असं ऐकतोय… या वक्तव्यानं सध्या राजकीय (Maharashtra politics) वर्तुळात चांगलीच खळबळ माजलीय. ज्या चौकडीमुळे उद्धव ठाकरेंशी थेट बोलणं अशक्य होतं, असा आरोप शिंदे गटातील नेत्यांनी आजपर्यंत केलाय. त्याच चौकडीत मिलिंद नार्वेकरांचा समावेश होतो. उद्धव ठाकरेंचे राइट हँड अशी त्यांची ख्याती आहे.
कुणाचं वक्तव्य?
दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी शिंदे गटातील नेत्यांनी धुळ्यात एक बैठक घेतली. यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हेही उपस्थित होते.
यावेळी भाषण करताना पाटील यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत, आणि इतरांवर चौफेर टीका केली. हिंदुत्व कशा पद्धतीने धोक्यात आलं होतं ? हे यावेळी पाटील यांनी उपस्थितांना ठणकावून सांगितलं.
उद्धव ठाकरे यांना भानामती केल्यासारखे हे निर्णय घ्यायला लागले होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
ते म्हणाले, ‘ गुलाबराव पाटलांनी 50 खोके घेतले असतील, तर मग चरण सिंग थापांनी काय घेतलं? ते का सोडून गेले ?
गुलाबराव पाटील काय म्हणाले पहा-
त्यानंतर पुढे म्हणाले, आता मिलिंद नार्वेकर ही येणार असं एकातोय… धनुष्यबाण चिन्ह भेटल्यावर 15 पैकी पाचही आमदार ठाकरेंकडे शिल्लक राहणार नसल्याचा दावा पाटील यांनी यावेळी केला.
काही बिंदु जुळतायत?
मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येण्याच्या चर्चा आधीही अनेकदा घडल्या. गणेशोत्सव काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांच्या घरी गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. पण दरवर्षी प्रमाणे गणेशाचं दर्शन घेतल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. 23 सप्टेंबर रोजी एक बातमी धडकली.
उद्धव ठाकरेंनी त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर बदलले. त्याऐवजी रवी म्हात्रेंना नेमले. उद्धव ठाकरेंभोवतीची चौकडी असा आरोप होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं गेलं. पण शिवसेनेच्या आतील गोष्टी एवढ्या सहजा सहजी बाहेर येणं कठीण आहे. पण सध्या राजकीय वर्तुळात हे बिंदू जुळवून पाहिले जातायत.