शिवसेना मिळाली, शिंदेंचं पुढचं पाऊल काय? ‘या’ कार्यलयावर हक्क सांगणार, ठाकरे गटाची रणनीतीही ठरली!

| Updated on: Feb 20, 2023 | 10:23 AM

Uddhav Thackeray गटातर्फे शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी अखेरचे प्रयत्न होत आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देत ठाकरे गट आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

शिवसेना मिळाली, शिंदेंचं पुढचं पाऊल काय? या कार्यलयावर हक्क सांगणार, ठाकरे गटाची रणनीतीही ठरली!
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) ही एकनाथ शिंदे यांच्या गटाची असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ताकद वाढल्याचे चित्र आहे. याच निर्णयाच्या बळावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिक आक्रमक पावले टाकत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत शिंदे गटाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. यात शिंदे गटाचे आमदार उपस्थित राहणार असून या बैठकीनंतर सर्व आमदार विधानसभा अध्यक्ष भरत गोगावले यांची भेट घेणार आहेत.

विधीमंडळ कार्यालयावर हक्क सांगणार

शिवसेना पक्ष आणि चिन्ह आयोगाकडून मिळाल्यानंतर शिंदे गट आता राज्यभरातील शिवसेनेची कार्यालयं ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. याच मालिकेत शिंदे गटाचे आमदार विधीमंडळलातील शिवसेना कार्यालयावर हक्क सांगतील. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची महत्त्वाची बैठक होत आहे.

ठाकरे गटाची आजची रणनीती काय?

दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे गटाचे नेते आणि उल्हास बापट यांच्यादरम्यान महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतंय.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट कोर्टात जाणार आहे. मात्र ही दाद सुप्रीम कोर्ट का दिल्ली हायकोर्टात मागयची, यावरून ठाकरे गटात संभ्रम होता. मात्र ठाकरे गट सुप्रीम कोर्टातच याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, मातोश्रीबाहेर आज ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे मोठं शक्तिप्रदर्शन होणार आहे. राज्यभरातून आलेले शिवसैनिक या शक्तिप्रदर्शनात पक्षाची ताकद दाखवतील.

शिंदे गटाचेही कॅव्हेट

दरम्यान, उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याने शिंदे गटानेही पुढची रणनीती आखली आहे. ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली तर एकतर्फी सुनावणी घेऊन कोणताही आदेश जारी केला जाऊ नये म्हणून एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे.

कॅव्हेट म्हणजे काय?

एखादं प्रकरण कोर्टासमोर दाखल होण्याची शक्यता असल्यास पक्षकार कॅव्हेट दाखल करू शकतो. सदर खटल्यात आपल्यालाही म्हणणं मांडण्याची संधी द्यावी, अशी विनंती कॅव्हेटद्वारे कोर्टाकडे केली जाते. कॅव्हेट दाखल करणाऱ्या पक्षकाराला भविष्यात येणाऱ्या खटल्यात आपली बाजू बांडण्याची पूर्ण संधी दिली जाते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतरच कोर्टाकडून निकाल दिला जातो.