तोंडावर आपटण्यापेक्षा पळालेलं बरं म्हणून पळाले, अंधेरीवरून उद्धव ठाकरेंची टीका
पोहरादेवीच्या दर्शनाला मी येणार आहे. कुठे आणि कधी मेळावा घ्यायचा हे तुम्ही ठरवा. मी दसरा मेळावा होईपर्यंत थांबलो होतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईः अंधेरी पोट निवडणुकीत (Andheri East By Poll) भाजपला तोंडावर आपटण्याची भीती होती. त्यामुळे निवडणुकीत माघार घ्यायची होती. स्वतःला माघार घेता येत नव्हती, त्यामुळे कुणाला तरी विनंती करावी लागली… विनंती करा… विनंती करा म्हणून फिरत होते… असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला लगावला. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार माघारी घ्यावा, अशी विनंती राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. ही विनंती भाजपने राज ठाकरेंकडून करवून घेतल्याचा आरोप केला जातोय. उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून शिंदे-भाजपाला खडे बोल सुनावले. यवतमाळमधील संजय देशमुख यांनी आज शिवबंधन बांधले. शिंदे गटातील संजय राठोड यांचे ते विरोधक मानले जातात. त्यांच्या शिवसेना प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे आणि राज ठाकरेंवर टीका केली.
शिंदे गटाला निवडणूकच लढवायची नव्हती तर माझं चिन्ह गोठवण्याची एवढी घाई कशासाठी केली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. शिंदेंनी शिवसेनेचं चिन्ह गोठवलं, नाव गोठवलं आणि लढायला मात्र भाजपला पुढे केलं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ज्या ज्या वेळी शिवसेनेवर आघात झाले तेंव्हा शिवसेना दसपट मोठी होते. शिवसेना फुटल्यापासून पक्षात येणाऱ्या लोकांचा ओघ सुरुच आहे. वेगवेगळ्या धर्माचे लोक येऊन भेटत आहेत. त्यामुळे शिवसेनेचं काय होणार, हा प्रश्न मला नाहीये. पण देशाच्या लोकशाहीचं काय होणार, हा प्रश्न आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पोहरादेवीच्या दर्शनाला मी येणार आहे. कुठे आणि कधी मेळावा घ्यायचा हे तुम्ही ठरवा. मी दसरा मेळावा होईपर्यंत थांबलो होतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाण्यात चीडीचूप होईन असे दाखवले गेले. पण तिथेही शिवसैनिक चिडून उठले आहे. मी ठाण्यातही येऊन मेळावा घेईन, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.