सावंत, सरनाईक ते सत्तार, शिवसेनेत नाराजांची फळी
प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, दीपक सावंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, रामदास कदम असे शिवसेनेतील दिग्गज नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला ‘अच्छे दिन’ येतील, अशी शिवसेना नेत्यांची अपेक्षा होती. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रिमंडळात सामावून घेताना महत्त्वाची खाती सोडावी लागली आणि शिवसेनेच्या वाट्याला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं) आली. मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असला, तरी राष्ट्रवादीला जास्त मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यातच ज्येष्ठांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या भूमिकेमुळे शिवसेनेत नाराज नेत्यांची फळी (Unhappy MLAs of Shivsena) पाहायला मिळत आहे.
प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, दीपक सावंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, रामदास कदम असे शिवसेनेतील दिग्गज नेते नाराज असल्याची चर्चा आहे. फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेले शिवसेनेचे जुने-जाणते नेते दिवाकर रावते, दीपक केसरकर, रामदास कदम, रवींद्र वायकर, दीपक सावंत यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप होण्याआधीच शिवसेनेला पहिला धक्का बसला. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असताना पदरी पडलेलं राज्यमंत्रिपद आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर कमालीचे नाराज होते. या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
खातेवाटपाआधीच शिवसेनेला पहिला धक्का, अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा
माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंतही नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षश्रेष्ठी काम देत नसल्याची खंत दीपक सावंत यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.
मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक प्रचंड नाराज असल्याचं म्हटलं जातं. ‘आज आमची लायकी नाही, असं कदाचित पक्षाला वाटत असेल. मात्र आम्ही आमची लायकी सिद्ध करु आणि पक्षाला दखल घेण्यास भाग पाडू. त्यानंतरच मंत्रिपद मिळवू’ असं सरनाईक म्हणाले होते.
ठाण्यात सरनाईक आणि एकनाथ शिंदे या दोन्ही घराण्यांचं वर्चस्व आहे. मात्र दोघांमध्येही राजकीय चढाओढ पाहायला मिळते. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे विस्तारामध्ये सरनाईकांना संधी मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र शिंदेनंतर ठाण्यातील दुसरे नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपद मिळाल्यामुळेही प्रताप सरनाईक यांचा तिळपापड झाल्याचं म्हटलं जातं.
माजी मंत्री तानाजी सावंत यांनाही मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सावंतही नाराज असल्याचं समोर आलं आहे. तर माजी मंत्री रामदास कदम यांनीही ज्येष्ठ नेत्यांना ‘साईडलाईन’ केल्यामुळे नाराजी व्यक्त करत शपथविधीला गैरहजेरी लावली होती.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत घरवापसी करणारे शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही आपला त्रागा उघडपणे व्यक्त केला होता. ‘मी नाराज नाही, पण चकित झालो आहे. उद्धव ठाकरेंनी मला मंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे मी निश्चिंत होतो’ असं जाधव म्हणाले होते.
सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे राऊत बंधू नाराज असल्याच्या चर्चा होत्या. सुनिल राऊत आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं (Unhappy MLAs of Shivsena).