मुंबई : काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar resigns Congress) हिने पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षांतर्गत राजकारण सोडवण्यासाठी आपला वापर झाल्याचं उर्मिलाने काँग्रेसचा राजीनामा देताना सांगितलं (Urmila Matondkar resigns Congress) आहे. अवघ्या सहा महिन्यांतच उर्मिलाने पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा उर्मिला मातोंडकरने केला आहे. उर्मिला दुसऱ्या पक्षाची वाट धरणार की राजकारणाला रामराम ठोकणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Actor-turned-politician Urmila Matondkar resigns from the Congress party. She states ‘My political and social sensibilities refuse to allow vested interests in the party to use me as a mean to fight petty in-house politics instead of working on a bigger goal in Mumbai Congress.’ pic.twitter.com/QJdUIswMJk
— ANI (@ANI) September 10, 2019
राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने मार्च महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच तिला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर करण्यात आलं. मात्र भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला मातोंडकरला पराभवाची धूळ चारली होती.
सध्या कलात्मक स्वातंत्र्यावर गदा आली आहे, त्यामुळे मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करत राहणार आहे, फक्त निवडणुकांपुरते काम न करता, नेहमीच काम करेन, असं उर्मिला मातोंडकरने काँग्रेसप्रवेशावेळी म्हणाली होती.
सध्याच्या स्थितीत सर्वांना एकत्रित घेऊन चालणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. जो सर्वांना न्याय देईल, जो सर्वांना सोबत घेऊन काम करेल, अशा नेत्याची गरज आहे. माझ्या नजरेत राहुल गांधी त्या नेत्याप्रमाणे आहेत, असंही उर्मिलाने पक्षप्रवेशावेळी नमूद केलं होतं.
45 वर्षीय उर्मिला मातोंडकरने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उर्मिलाचे रंगीला, प्यार तुने क्या किया, भूत, कौन यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत. उर्मिलाच्या डान्सचेही चाहते आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये फारशी दिसली नव्हती. काही वर्षांपूर्वी ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात ती झळकली. त्यानंतर राजकारणातून तिने आपली सेकंड इनिंग सुरु केली होती. मात्र आता राजकारणातूनही तिने एक्झिट घेतल्याचं दिसत आहे.
संबंधित बातम्या
मी धर्मांतर केलेलं नाही, माझा धर्म विचारणारे हे कोण? उर्मिलाकडून टीकाकारांचा समाचार
माझ्यावर हल्ला करण्यासाठी भाजपने गुंड पाठवले : उर्मिला मातोंडकर