ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून बनावट स्टॅम्पचा वापर; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबईत 4 हजार 682 खोटी प्रतिज्ञापत्र बनवली गेल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. पोलिसांनी ही सर्व बनावट प्रतिज्ञापत्र जप्त केली आहेत.
मुंबई : मुंबईत खोट्या प्रतिज्ञापत्रांचा घोटाळा उघड झाला आहे. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर बनावट स्टॅम्पचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई क्राईम ब्रांचने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे ठाकरे गट अडचणीत आला आहे.
मुंबईत 4 हजार 682 खोटी प्रतिज्ञापत्र बनवली गेल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. पोलिसांनी ही सर्व बनावट प्रतिज्ञापत्र जप्त केली आहेत. ठाकरे गटाने खोटी प्रतिज्ञापत्र बनवल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे.
मुंबई क्राईम ब्रांचने मुंबईत एक मोठी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी वांद्रे, माहिम परिसरात धाड सत्र राबवले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्र हस्तगत केली आहेत. या कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.
शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे.
शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत प्रतिज्ञापत्र सादर केली. शिवसैनिकांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर केल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान उघडकीस आली आहे. या प्रतिज्ञा पत्रांसाठी मोठ्या प्रमाणात बनावट आयकार्डचा वापर करण्यात आल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळत आहे.