काँग्रेसच्या अडचणीत वाढ, विधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्या मुंबईतील जागांसाठी मुलाखती सुरु
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार आहेत. मुंबईतील 36 विधानसभा जागांसाठी या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यासह इतर लहान-मोठ्या पक्षांनीही तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार आहेत. मुंबईतील 36 विधानसभा जागांसाठी या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यामुळे काँग्रेसच्या अडचणीत मात्र भर पडणार आहे.
दादरमधील आंबेडकर भवन या ठिकाणी मुलाखती घेतल्या जाणार आहे. अण्णाराव पाटील, अशोक सोनोने, रेखाताई ठाकूर, किसन चव्हाण यांचं संसदीय मंडळ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी सुरु केली होती. राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागांसाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या होत्या. त्यानुसार गेल्या महिन्यात विदर्भातील इच्छुक उमेदवारांसाठी 13, 14 आणि 15 जुलैला इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. 13 जुलैला नागपूर, 14 जुलै अमरावती आणि 15 जुलैला अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये मुलाखती झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) सोबत घेण्याचा अटोकाट प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. वंचितने काँग्रेसला फक्त 40 जागांची ऑफर देऊन आघाडीमध्ये जाण्याबाबतची भूमिका अप्रत्यक्षपणे स्पष्ट केल्याचं बोललं जातंय. त्यातच सर्व जागांसाठी मुलाखती म्हणजे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही वंचितेन स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्याशिवाय जर काँग्रेससोबत राष्ट्रवादी नसेल तरच आघाडी करणार असल्याची अशक्यप्राय अटही वंचितने ठेवली आहे.