वंचित आघाडीचं मिशन मुंबई महापालिका, किती जागा लढवणार?; प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आकडा जाहीर
त्यामुळे मणिपूरमधील मैतेई समजला आदिवासीचा दर्जा देऊन त्यांना आरक्षण देण्यात आलं आणि त्यांच्या मार्फत आता मणिपूर मधील जमीन हस्तगत करण्यात येणार आहे. या मणिपूरमधील दोन समाजात भांडण लावण्यात आली आहेत.
मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत 88 जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, ठाकरे गटासोबत युती करून निवडणूक लढवणार की स्वबळावर निवडणूक लढवणार हे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं नाही. आम्ही मुंबई महापालिकेत 88 जागा लढवणार आहोत. त्यामुळे बदलाचं राजकारण सुरू होणार आहे, असं सांगतानाच मुस्लिम समाजात आता नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. मुस्लिम मतदारसंघात महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत बदल झाला पाहिजे. आम्ही महापालिकेत 88 जागा लढवणार आहोत, आम्हाला जर महापालिकेत मुस्लिमांनी मदत केली तर बदल घडून येईल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मुस्लिम राजकारणावरही भाष्य केलं. खूप वर्षापासून मी मुस्लिमांचं राजकारण पाहत आलो आहे. मुस्लिमांच्या राजकारणात गढे मुर्दे उखडले जात आहेत. यांना दंगली हव्या आहेत काय? अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी अबू आझमी यांचं नाव न घेता टीका केली.
दंगली होणार
आम्ही ज्यांना गाडलं त्यांना विधानसभेत पुन्हा जिवंत केलं जातं आहे. ही कोणती राजनीती आहे? यांना काय हवं आहे? परिस्थिती अजून खराब होणार आहे. दंगली होतील आणि हे घडवून आणण्याच काम होणार आहे. कारण काही लोकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.
म्हणून मणिपूरमध्ये भांडण लावलं
मणिपूरच्या दंगली संदर्भात बोलायचं गेलं तर मणिपूरच्या जंगलात प्लॅटिनम आणि युरेनियम या खनिजांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मणिपूरमधील या खनिज संपत्तीवर अधिकार कोणाचा हा प्रश्न आहे. हा आदिवासी लोकांचा प्रश्न आहे. संविधानाने सांगितलं आहे की, जर आदिवासी क्षेत्रात तुम्हांला काही करायचं असेल तर त्यांची परवानगी ही महत्त्वाची आहे.
मग आता खनिज संपत्ती तर सापडलीय, त्यामुळे आताच त्याचं उत्खनन करण्याची गरज आहे. परंतु या उत्खननाची परवानगी स्थानिक आदिवासी देणार नाहीत. त्यामुळे मणिपूरमधील मैतेई समजला आदिवासीचा दर्जा देऊन त्यांना आरक्षण देण्यात आलं आणि त्यांच्या मार्फत आता मणिपूर मधील जमीन हस्तगत करण्यात येणार आहे. या मणिपूरमधील दोन समाजात भांडण लावण्यात आली आहेत, असा दावा त्यांनी केला.
मौलवींना आवाहन
मुस्लिम व्यक्तींना मणिपूरमधील घटनेच्या संदर्भात काही माहिती नसल्यामुळे ते काही या विषयासंदर्भात बोलत नाही. त्यामुळे या बैठकीत जे मौलवी आहेत त्यांनी हे सगळ्यांना सांगावं आणि जे काही आता राजकारणात सुरू आहे याची देखील माहिती द्यावी, असं आवाहन आंबेडकर यांनी केलं.