Vasant More : राज ठाकरेंच्या सभेच्या आधी वसंत मोरे एक्टिव्ह होणार; राज यांना भेटल्यावर नाराजी दूर होईल, वसंत मोरेंचे स्पष्टीकरण
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेच्या विरोधी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती. त्यानंतर त्यांना शहराध्यक्षपदावरुन पायउतार करण्यात आलं. तेव्हापासून वसंत मोरे नाराज आहेत आणि स्थानिक पातळीवर त्यांना डावललं जात असल्याचीही चर्चा सुरु आहे.
पुणे : अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेची तारीख जाहीर केल्यानंतर, आपण एक्टिव्ह होणार आहोत, अशी माहिती पुण्यातील मनेसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली आहे. जर सभेच्या तयारीसाठी ठाण्यात आणि संभाजीनगरला जाऊ शकतो, तर पुण्यात जोरदार तयारी करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील सभा राजकीयदृष्ट्या आणि पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Election) दृष्टीने महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. या सभेसाठी आपल्यापद्धीतने तयारी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेच्या विरोधी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती. त्यानंतर त्यांना शहराध्यक्षपदावरुन पायउतार करण्यात आलं. तेव्हापासून वसंत मोरे नाराज आहेत आणि स्थानिक पातळीवर त्यांना डावललं जात असल्याचीही चर्चा सुरु आहे.
राज ठाकरेंना भेटल्यावर नाराजी दूर होईल
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये वसंत मोरेंचे नाराजी नाट्य सुरु आहे. याबाबत राज ठाकरेंना भेटायचे आहे. त्यांच्याशी भेट झाली की नाराजी दूर होईल, असेही त्यांनी सांगितले. गेल्या वेळी राज ठाकरे जेव्हा पुण्यात आले होते, तेव्हा त्यांच्याशी भेट होऊ शकली नव्हती. या वेळेस मला वेळ दिला होता, मात्र अचानक तब्येत बिघडल्यानं राजसाहेब मुंबईला गेले. पुढच्या वेळेस नक्की वेळ देतील. मात्र, पुण्यातील सभा आमच्यासाठी निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची आहे. मी माझ्या पद्धतीने तयारी करणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिलीय.
वसंत मोरेंनी साईनाथ बाबरांसोबतचा फोटो केला पोस्ट
वसंत मोरे तसेच मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर शिवाजी नगर पोलीस स्टेशनला हजर झाले. पाण्याच्या प्रश्नासंदर्भात वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी महानगरपालिकेमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. साईनाथ बाबर यांच्यासोबतचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे आणि तसे नाही तर असे तरी एकत्र आलोच, अशी कॅप्शन लिहिली आहे. मनसेच्या वतीने 17 मार्च रोजी पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेच्या आवारात कोणतेही आंदोलन करण्यास मनाई असताना त्यांनी आंदोलन केल्यामुळे तेथील सुरक्षारक्षकाने लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आम्ही पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनला एकत्र आलो. आम्ही एकत्रच आहोत. आमच्यात काही मतभेद आहेत, मनभेद नाहीत, असे स्पष्टीकर वसंत मोरेंनी दिले आहे. साईनाथ बाबर आमच्या तालमीत तयार झाला आहे. साईनाथ बाबर माझे मित्र आहेत आणि राजसाहेब ठाकरे माझे अध्यक्ष आहेत. राज ठाकरेंना भेटणार, असे मोरे म्हणाले.