Loksabha Election 2024 | पुण्यात मनसेकडून ‘हे’ 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक, राज ठाकरेंना पाठवली नाव

| Updated on: Feb 02, 2024 | 10:19 AM

Loksabha Election 2024 | राज्यातील सर्वच्या सर्व लोकसभेच्या 48 जागा लढवण्याइतकी मनसेची ताकद नाहीय. पण मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरी पट्ट्यात मनसेला जनाधार आहे. त्यामुळे शहरीबहुल मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करु शकते.

Loksabha Election 2024 | पुण्यात मनसेकडून हे 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक, राज ठाकरेंना पाठवली नाव
raj thackeray
Follow us on

पुणे, (प्रदीप कापसे) | लोकसभा निवडणुकीला आता काही महिने उरले आहेत. मागच्या वर्षीपासून राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि ठाकरे गटाच्या बैठका सुरु आहेत. महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यामध्ये सुद्धा चर्चा सुरु आहेत. या दोन्ही आघाड्यांबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यासाठी मनसेकडून सुद्धा काही महिन्यांपासून चाचपणी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीतील मतांवरुन विधानसभेची ताकद लक्षात येणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावेल. राज्याच्या राजकारणात मनसेकडे राजू पाटील यांच्या रुपाने फक्त एकमेव आमदार आहे. पण म्हणून मनसेची ताकदच नाही अस म्हणता येणार नाही.

राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पसरलेले आहेत. राज ठाकरेंच्या प्रत्येक सभेला मोठ्या संख्येने गर्दी होते. प्रत्यक्ष मतपेटीतून मनसेचा जनाधार दिसत नसला, तरी त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे कोणासोबत जाणार? हे अजून स्पष्ट झालेलं नाहीय. मनसेची भूमिका एकला चलो रे ची असू शकतो. राज्यातील सर्वच्या सर्व लोकसभेच्या 48 जागा लढवण्याइतकी मनसेची ताकद नाहीय. पण मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरी पट्ट्यात मनसेला जनाधार आहे. त्यामुळे शहरीबहुल मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करु शकते.

पुण्यातून कोण पाच जण इच्छुक?

पुण्यासाठी मागच्या काही महिन्यांपासून मनसेची चाचपणी सुरु आहे. आता पुण्यातून मनसेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कोण इच्छुक आहे? त्यांची नाव समोर आली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची नाव राज ठाकरे यांना कळवण्यात आली आहेत. लोकसभा प्रभारींनी राज ठाकरेंना नावांचा अहवाल दिला आहे. पुण्यातून 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यात वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे,गणेश सातपुते, यांच्या नावाचा समावेश आहे. आता राज ठाकरे कोणाला संधी देणार ? ते पहाव लागेल.