अमित देशमुखांना आव्हान, राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेवक वंचितचा उमेदवार
वंचितचे उमेदवार राजासाब मणियार हे राष्ट्रवादीचे लातूर महापालिकेत एकमेव नगरसेवक होते. आता ते काँग्रेस विरोधात विधानसभा लढवणार आहेत.
लातूर : शिवसेना आणि भाजप लातूर विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे घेण्यासाठी रस्सीखेच करत आहेत. तर दुसरीकडे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Amit vilasrao Deshmukh Latur) आणि कुटुंबीयांचा परंपरागत मतदारसंघ असलेलं लातूर यावेळी नेमकं कुणाला विजयी करणार याकडे लक्ष लागलंय. कारण, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या (Amit vilasrao Deshmukh Latur) परंपरागत व्होट बँकेवर लक्ष ठेवून मुस्लीम उमेदवार दिला आहे. वंचितचे उमेदवार राजासाब मणियार हे राष्ट्रवादीचे लातूर महापालिकेत एकमेव नगरसेवक होते. आता ते काँग्रेस विरोधात विधानसभा लढवणार आहेत.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा पराभव
गेली अनेक वर्ष लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. विलासराव देशमुख यांच्यानंतर येथून त्यांचे पुत्र अमित देशमुख (Amit vilasrao Deshmukh Latur) हे आमदार म्हणून निवडून येत आहेत. विलासरावांच्या निधनानंतर काँग्रेसचा गड असलेलं लातूर काहीसं खिळखिळं झालं. लातूर महापालिका आता भाजपाकडे आहे. केवळ दोन-चार नगरसेवकांचा फरक असला तरी काँग्रेस विरोधी बाकावर आहे. तर काँग्रेसमधून भाजपात गेलेले अनेक जण नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळं लातूर शहर मतदारसंघावर प्रत्यक्ष परिणाम करणारी महापालिका भाजपकडेच आहे.
जिल्हा परिषदही भाजपाच्याच ताब्यात आहे. लातूर जिल्ह्यातल्या सहापैकी तीन विधानसभांवर काँग्रेसचे आमदार, तर तीन ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे यावेळची लढत अटीतटीचीच होणार असल्याचं चित्र आहे.
मतांचं गणित
लातूर शहर विधानसभा क्षेत्रात मुस्लीम, एससी, एसटी, लिंगायत समाजाचं मोठं मतदान आहे. काँग्रेसचा विजय हा आजपर्यंतच्या निवडणुकीत इथे दलित-मुस्लीम मतांवर अवलंबून राहिला. यावेळी वंचित आघाडीने दिलेला मुस्लीम उमेदवार हा इतर मुस्लीम उमेद्वारांपेक्षा वेगळा आहे. त्यांची प्रतिमा दलित-मुस्लीम आणि इतर लोकांमध्येही आहे.
लातूर महानगरपालिकेची निवडणूक ही यावेळी अटीतटीची झाली. काँग्रेस (Amit vilasrao Deshmukh Latur) इथे सत्तेपासून दूर राहिली. भाजपाने महापालिका आपल्या ताब्यात घेतली, तर इथे राष्ट्रवादी पूर्णपणे संपली. मात्र राष्ट्रवादीतून राजासाब मणियार हे एकमेव निवडून आले. यावरून त्यांचं लोकांमध्ये वजन असल्याचं सिद्ध होतं. यामुळेच काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.
भाजपातही इच्छुकांची गर्दी
गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहिलेले शैलेश लाहोटी यावेळीही तयारीत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह हे त्यांचे पाहुणे असल्याने त्यांना उमेदवारी मिळेल असं भाजपातल्या कार्यकर्त्यांना वाटतं. तरी देखील काही नव्या चेहऱ्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे भाजपकडून शैलेश लाहोटीच उमेदवार राहतील की प्रेरणा होनराव, मन्मथ भातांब्रे यांसारख्या नवोदित चेहऱ्याचाही विचार होईल हे सांगता येणार नाही. काँग्रेसला अमित देशमुखांच्या पुढे कोणताही उमेदवार आला तरी काही फरक पडणार नाही. कारण, अमित देशमुख (Amit vilasrao Deshmukh Latur) आणि त्यांच्या कुटुंबीयांचे लोकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
लातूर शहर विधानसभा 2014 ची लढत
- काँग्रेस – अमित देशमुख, 119656 मते
- भाजपा – शैलेश लाहोटी, 70191 मते
- राष्ट्रवादी – मुर्तजा पठाण, 4047 मते
- शिवसेना – श्रीपाद कुलकर्णी, 2323 मते
कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपाने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर सोपवली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा गड राखण्याची जबाबदारी अमित देशमुखांवर आहे. या दोघांना बाजूला सारून आपला झेंडा लातूरवर फडकावयाची तयारी वंचितने केली आहे.