Telagana New Cm : तेलंगणातील केसीआर यांच्या अत्यंत जवळचा नेता ते मुख्यमंत्री, कसा आहे रेवंत रेड्डी यांचा राजकीय प्रवास?

| Updated on: Dec 05, 2023 | 8:50 PM

2014 मध्ये आंध्र प्रदेश राज्याचे दोन भाग झाले. त्यातून तेलंगणा हे स्वतंत्र राज्य झाले. याच वेगळ्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून केसीआर यांनी शपथ घेतली. त्यावेळी रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्री केसीआर यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते.

Telagana New Cm : तेलंगणातील केसीआर यांच्या अत्यंत जवळचा नेता ते मुख्यमंत्री, कसा आहे रेवंत रेड्डी यांचा राजकीय प्रवास?
Telagana New Cm Revanth Reddy
Follow us on

तेलंगणा | 5 डिसेंबर 2023 : तेलंगणा निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर झाला. 119 मतदारसंघांपैकी कॉंग्रेसने 64 जागा जिंकल्या. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सोमवारी 4 तारखेला कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. सुमारे 40 मिनिटे चाललेल्या या बैठकीत आमदारांनी नेता निवडीची जबाबदारी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला. उपस्थित निरीक्षकांनी तसा प्रस्ताव दिल्लीला पाठवला आणि दिल्लीवरून रेवंत रेड्डी यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली.

केसीआर यांच्या अत्यंत जवळचे नेते रेवंत रेड्डी

2014 मध्ये आंध्र प्रदेश राज्याचे दोन भाग झाले. त्यातून तेलंगणा हे स्वतंत्र राज्य झाले. याच वेगळ्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून केसीआर यांनी शपथ घेतली. त्यावेळी रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्री केसीआर यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. केसीआर जिथे जातील तिथे रेड्डी नेहमीच त्यांच्यासोबत असयाचे. रेड्डी यांचे उत्कृष्ट वक्तृत्व पक्ष संघटन, आणि पक्षाप्रती समर्पण यामुळे ते इतर नेत्यांपेक्षा वेगळे होते. त्यांच्या याच गुणांमुळे केसीआर यांनी त्यांना तेलंगणा तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) कार्याध्यक्ष केले होते.

अभाविपपासून राजकारणाची सुरवात

अविभाजित आंध्र प्रदेशातील महबूबनगर येथे 1969 मध्ये रेवंत रेड्डी यांचा जन्म झाला. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी प्राप्त केली. विद्यार्थी असताना ते ABVP चे सदस्य होते. 2006 मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुक लढविली. अपक्ष उमेदवार म्हणून मिडजिल मंडलमधून ते ZPTC सदस्य म्हणून निवडून आले. 2007 मध्ये रेवंत रेड्डी हे विधान परिषदेत अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. याच काळात त्यांनी तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) चे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांची भेट घेत पक्षात प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांची भाची गीता यांच्याशी ते विवाहबद्ध झाले.

आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री

2009 मध्ये टीडीपीच्या तिकिटावर आंध्रमधील कोडंगल मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये तेलंगणा विधानसभेत त्यांच्यावर टीडीपीचे सभागृह नेते म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ऑक्टोबर 2017 मध्ये रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये कॉंग्रेसने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यावेळी मोदी लाट असूनही मलकाजगिरी मतदारसंघातून रेड्डी प्रचंड मतांनी निवडून आले. जून 2021 रोजी तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

डिसेंबर २०२३ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत रेवंत रेड्डी यांनी अतिशय मेहनत घेतली. कॉंग्रेसची सत्ता आणण्यात रेवंत रेड्डी यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रचार दरम्यान त्याचे कोडंगल मतदारसंघाकडेही लक्ष होते. येथून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या याच मेहनतीचे फळ म्हणून दिल्ली हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.