मुंबई : पाठीच्या मणक्यावरील शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्य कारभारात प्रत्यक्षपणे सहभागी होताना दिसत नाहीत. आजपासून हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरुवात झाली आहे. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री अनुपस्थित राहिले. त्यामुळे भाजप नेत्यांकडून जोरदार टीका केली जातेय. तसंच मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत कारभार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे देण्याचा सल्लाही दिला जातोय. मात्र, गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अजित पवारांच्या हाती राज्य दिले तर ते चार दिवसांत विकून खातील, अशी घणाघाती टीका केलीय.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेत विविध विषयांवरून जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. परीक्षा घोटाळा, शेतकरी मदत, एसटी कर्मचारी आंदोलन, आदी मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. अशावेळी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या कारभार आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अजित पवारांकडे कारभार देण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, अजित पवारांच्या हातात राज्य दिलं तर ते चार दिवसांत विकून खातील, अशी जळजळीत टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीबाबत पडळकरांना प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना, अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज देणं म्हणजे हे अधिवेशन गुंडाळण्याअगोदर महाराष्ट्र विकून टाकतील. माझं तर असं स्पष्ट मत आहे की त्यांच्याकडे कशाला चार्ज देताय. आता सरकारमधील काही भाग तुम्ही त्यांना दिलाय. तरी 2 लाख 50 हजार कोटीच्या वर निधी त्यांनी त्यांच्या लोकांना दिलाय. आता तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दिला तर हे राज्य विकून खातील, हे दुसरं काही करु शकत नाहीत, अशी टीका पडळकर यांनी केलीय.
उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कोणती टीका कोण का करतो? हे सर्वांनाच माहीत आहे. राज्य विकणे म्हणजे ह्यांना चहा विकण्यासारखे वाटेल का? भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी देश विकायला निघाले आहेत, यांनी सगळेच विकले आहे, असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर, चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बोलावे तेवढी त्यांची पातळी नाही. अजित पवार उत्तम प्रशासक आहेत, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुशल नेतृत्व आहे, असंही मिटकरी यावेळी म्हणाले.
इतर बातम्या :