निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 11 जानेवारी 2024 : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. अध्यक्षांनी कुणाही आमादारांना अपात्र ठरवलं नाही. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. पण ठाकरे गटाचं चिन्ह आणि पक्षाचा ताबा मात्र शिंदे गटाकडे दिला आहे. तसेच शिंदे गटाचा प्रतोदच कायदेशीर असल्याचा निर्वाळाही दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या हातून पक्ष कायमचा गेला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसैनिकांनी या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. याच घडामोडीत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील फोटो पाहिल्यावर तुम्हालाही गलबलून आल्याशिवाय राहणार नाही.
आदित्य ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात काही फोटोही आहेत. मी नेहमीच तुमच्यासोबत राहील, असं कॅप्शन या फोटोला आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. या व्हिडीओत चार पाच फोटो आहेत. त्यातील पहिल्या फोटोत आदित्य ठाकरे हे वडील उद्धव ठाकरे यांना कडकडून मिठी मारताना दिसत आहे. या फोटोच्या बाजूलाच दुसरा फोटोही दाखवण्यात आला आहे. त्यात वाघ आपल्या बछड्याला घट्ट बिलगून जाल. या व्हिडिओची आणि त्यातील फोटोची प्रचंड चर्चा होत आहे. हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
हा फोटो आजचा नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी वडिलांना घट्ट मिठी मारत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हाचा हा फोटो आहे. हा निकाल पक्षाच्या विरोधात गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हाच फोटो पुन्हा एकदा शेअर केला आहे. पण त्यासोबत वाघ आणि बछड्याच्या गळाभेटीचा फोटोही पोस्ट केला आहे. हा फोटो पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
हीच ती इंस्टाग्रामवरील व्हायरल पोस्ट –
या व्हिडीओत एकूण पाच फोटो आहेत. पहिला फोटो आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांची गळाभेट घेतानाचा आहे. त्यानंतरचे फोटो हे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचे आहेत. काही कार्यक्रमातील आहेत. तर काही विधानभवनाच्या प्रांगणातील आहेत.