मुंबई : विधानपरिषद उपसभापती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या म्हणजे अखेरच्या दिवशी ही निवडणूक होईल. मात्र ही निवडणूक होऊ नये, यासाठी भाजपने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली. (Vidhan Parishad Deputy Speaker Election)
भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान उपसभापती अर्थात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.
कोरोना संकटकाळात दोन दिवसाच्या अधिवेशनात काही आमदार अनुपस्थित आहेत. गोपीचंद पडळकर, परिणय फुके, प्रविण पोटे हे परिषदेवरील आमदार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यात निवडणुकीची घाई का? असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. भाजपने विधीमंडळात नेत्यांची बैठक बोलावली असून मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याबाबत यावेळी अंतिम निर्णय घेण्यात आला.
उपसभापती पदाचे उमेदवार कोण?
उपसभापती पदासाठी भाजप उमेदवार भाई गिरकर सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर आमदारपदी नियुक्त झाले आहेत. गिरकर यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषवले असून याआधी राज्यमंत्रिपदाची धुराही सांभाळली आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांनीही दीर्घ काळापासून विधानपरिषदेवर आमदारकी भूषवली आहे. विद्यमान उपसभापती असलेल्या गोऱ्हे शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
“उपसभापती पद एकमताने कारावं, अशी आमचीदेखील भूमिका होती. आता हे अधिवेशन संपल्यानंतर लगेच अधिवेशन नाही. पुढच्या अधिवेशनातही निवडणूक घेता आली असती. पण सदस्यांचा मतदानाचा हक्क जाणीवपूर्वक डावलून अशाप्रकारे लोकशाहीमध्ये निर्णय थोपण्याचं काम हे सरकार करत आहे. आमचंही मत आहे. आमचीदेखील मोठी संख्या आहे. आम्हीदेखील निवडणुका घेऊ शकतो. त्यामुळे आम्हीदेखील फॉर्म भरला आहे” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
78 सदस्यीय विधान परिषदेत 18 जागा सध्या रिक्त आहेत. उर्वरित 60 पैकी 23 सदस्यांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीकडे शिवसेना 15, राष्ट्रवादी 9, काँग्रेस 8, लोकभारती 1 असे 33 आमदारांचे संख्याबळ आहे.
विधान परिषद संख्याबळ
भाजप – 23
शिवसेना – 15
राष्ट्रवादी – 09
काँग्रेस – 08
लोकभारती – 01
शेकाप – 02
अपक्ष – 01
रासप – 01
रिक्त – 18
एकूण – 78
कोरोनामुळे अधिवेशनासाठी अनेक ज्येष्ठ सदस्य अनुपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेत या अधिवेशनात उपसभापती निवडणूक घेऊ नये, अशी मागणी अधिवेशनापूर्वीही भाजपने सरकारकडे केली होती. अनेक सदस्यांना मदतानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागेल, त्यामुळे ही निवडणूक घेऊ नये अशी विनंती करणारे पत्र सभापतींना पाठवण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले होते. मात्र आता निवडणूक जाहीर झाल्याने भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.
VIDEO: विधानपरिषद उपाध्यक्षपदाची निवडणूक, आघाडीकडून नीलम गोऱ्हे, तर भाजपकडून भाई गिरकर उमेदवारhttps://t.co/iS6FvpCjCe#Election #Assembly
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 8, 2020
(Vidhan Parishad Deputy Speaker Election)