Vidhan Parishad Election : शिवसेनेचे आमदार, मुक्काम पोस्ट “फाईव्ह स्टार” विधान परिषदेत गुलाल कुणाचा?
आमदारांना आता पवईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. आमदारांना कुणालाही भेटण्यास परवानगी नसणार आहे. महाविकास आघाडीचे नेते ठरवतील तसे मतदान होईल, अशा प्रतिक्रिया यावेळी नेत्यांनी दिल्या आहेत.
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) पराभवाचा धडा घेतल्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ताकही फुंकून पिताना दिसतेय. कारण शिवसेनेने सर्व आमदारांना हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवलं आहे. आज शिवसेना आमदार (Shivsena MLA) आणि काही अपक्ष आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. त्यानंतर आमदारांना आता पवईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. आमदारांना कुणालाही भेटण्यास परवानगी नसणार आहे. महाविकास आघाडीचे नेते ठरवतील तसे मतदान होईल, अशा प्रतिक्रिया यावेळी नेत्यांनी दिल्या आहेत. मागच्या निवडणुकीत सुहास कांदे यांचं मत बाद झाल्यानेही शिवसेनेला एका मताचा झटका बसला होता. त्याबाबतही आज आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली आहे.
काही अपक्ष आमदारही हॉटेलवर मुक्कामी
आजच्या बैठकीला फक्त शिवसेनेचे आमदार नव्हते. तर काही अपक्ष आमदारही उपस्थित होते. तसेच काही मित्र पक्षांचे आमदारही उपस्थित होते, अशी माहिती या बैठकीनंतर शिवसेना नेत्यांकडून देण्या आली आहे. तसेच बाकीचे सर्व आमदार सरळ हॉटेलवर येणार आहेत, असेही ते म्हणाले आहेत. प्रत्येक पक्षाने आपल्या मतांची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे, आणि ते सगळ्यांकडून होत आहे. हे प्रत्येक पक्षाला करणं भाग आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, कोरोना वाढतोय, सर्वांना सुरक्षा, तसेच पावसाचे दिवस आहेत, अशी उत्तरेही शिवसेना नेते देताना दिसून आले.
अनिल परब काय म्हणाले?
सगळ्या आमदारांनी दोन दिवस एकत्र राहायचं आहे. मतदानादिवशी एकत्र येऊन मतदान करायचं आहे. प्रत्येकाला ज्या सूचना दिल्या जातील त्याचं पालन होईल आणि महाविकास आघाडी एकत्र लढेल, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली. तसेच मागच्या चुका टाळू असेही ते म्हणाले. यावेळेला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तपासून व्यवस्थित मतदान होईल आणि आमचे सर्व आमदार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
भाजप नेते म्हणतात विजय आमचाच
तर दुसरीकडे भाजप नेते हे विजय आमचाच आहे, असे छातीठोकपणे सांगत आहेत. मागील निवडणुकीतील विजयाने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. तसेच फडणवीसांची रणनिती यावेळी रोखण्याचं आव्हान हे महाविकास आघाडीसमोर असणार आहे. त्यातच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकार न्यायालयाने नाकारल्याने आघाडीची आणखी दोन मतं कमी झाली आहेत. त्याचाही थेट फायदा भाजपला होणार आहे.