Vidhan Parishad Election : राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर सेफ, खडसेंचा विजयही सुकर?; राष्ट्रवादीचं नेमकं गणित समजून घ्या
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 28 मतांचा कोटा ठरवण्यात आलाय. पहिल्या पसंतीची 28 मतं रामराजे नाईक निंबाळकरांना (Ramraje Naik Nimbalkar) देण्यात आली आहेत. तर एकनाथ खडसे यांचाही विजय सुकर मानला जातोय. पण त्यांची भिस्त ही अपक्षांवर असणार आहे.
मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) मतदान आज पार पडलं. 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही अधिक रंगत पाहायला मिळाली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप नेत्यांकडूनही विजयाचा दावा केला जातोय. राज्यसभेला मोठा झटका बसल्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष कुठलाही धोका पत्करायला तयार नाहीत. त्यामुळेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपले उमेदवार विजयी करण्यासाठी मतांचं गणित पक्क केलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 28 मतांचा कोटा ठरवण्यात आलाय. पहिल्या पसंतीची 28 मतं रामराजे नाईक निंबाळकरांना (Ramraje Naik Nimbalkar) देण्यात आली आहेत. तर एकनाथ खडसे यांचाही विजय सुकर मानला जातोय. पण त्यांची भिस्त ही अपक्षांवर असणार आहे.
रामराजे निंबाळकर सेफ, खडसेंचा विजयही सुकर
राष्ट्रवादी काँग्रेसनं 28 मतांचा कोटा ठरवला आहे. उमेदवाराला विजयासाठी 26 मतांची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकूण 51 मतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्या पसंतीची मतं रामराजे नाईक निंबाळकरांना दिली आहेत. पहिल्या पसंतीची 28 मतं रामराजे नाईक निंबाळकरांना दिल्यानंतर राष्ट्रवादीकडे 23 मतं उरतात. अशा स्थितीत विजयासाठी आवश्यक असलेल्या 26 मतांनंतर 2 मतं ट्रान्सफर होतात. त्यामुळे राष्ट्रवादीकडे खडसे यांच्यासाठी 25 मतं राहतात. अशावेळी खडसेंना विजयासाठी एका मताची गरज उरते. राष्ट्रवादीला काही अपक्षांचाही पाठिंबा असल्यामुळे एकनाथ खडसे यांचा विजय सुकर असल्याचं दिसत आहे.
भाजपची रणनिती काय?
निवडणूक आयोगाने विजयासाठी 26 मतांचा कोटा ठरवला असला तरी भाजपने मात्र, 30 मतांचा कोटा ठरवला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजपने एकूण पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या चार उमेदवारांसाठी भाजपने पहिल्या पसंतीच्या 30 मतांचा कोटा ठरवला आहे. भाजपकडे 106 मते आहेत. सहा अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपकडे 112 मते आहेत. भाजपने 30 मतांचा कोटा ठरवल्याने चार उमेदवारांना पहिल्या पसंतीची 120 मते जाणार आहेत. विजयासाठी 26 मतांची गरज आहे. म्हणजेच चारही उमेदवारांची प्रत्येकी चार मते शिल्लक उरणार आहेत. प्रत्येकी चार म्हणजे एकूण 16 मते अतिरिक्त राहणार असून ही 16 मते लाड यांना ट्रान्सफर करण्यात येणार आहे. लाड यांना अतिरिक्त 16 मते मिळावीत म्हणूनच भाजपने 30 मतांचा कोटा ठरवल्याचं सांगितलं जात आहे.