Vidhan Parishad Election Result 2022 : शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी तरीही सेनेच्या गोटात सामसूम! एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

| Updated on: Jun 21, 2022 | 7:15 AM

विजयी उमेदवार सचिन अहिर वगळता शिवसेनेच्या एकाही बड्या नेत्याने माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिलेली नाही!

Vidhan Parishad Election Result 2022 : शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी तरीही सेनेच्या गोटात सामसूम! एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा
एकनाथ शिंदे नाराज?
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा हादरा देत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपलं नेतृत्व सिद्ध केलं. त्यावेळी संजय पवार यांचा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावेळी दिलेल्या प्रतिक्रियेची आणि अपक्ष आमदारांवर केलेल्या आरोपाची चांगलीच चर्चाही झाली होती. विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. त्याच सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांचा समावेश आहे. असं असलं तरी विजयी उमेदवार सचिन अहिर वगळता शिवसेनेच्या एकाही बड्या नेत्याने माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिलेली नाही! इतकंच नाही तर शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रक्रियेपासून अलिप्त असल्याचंच पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असले तरी शिवसेनेच्या गोटात असलेली सामसूम चर्चेचा विषय ठरतेय. एकनाश शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेनेचे उमेदवार विजयी, पण हक्काची मतं फुटली!

शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले. मात्र शिवसेनेची स्वत:ची आणि सहयोगी पक्ष आणि अपक्षांची तब्बल 12 मतं फुटली आहे. शिवसेनेचे 55 आमदार आहेत. प्रहार संघटनेचे 2, मंत्री शंकरराव गडाख आणि अपक्ष सहा अशी मिळून शिवसेनेकडे एकूण मतांची संख्या 64 इतकी आहे. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मिळून 52 मतं मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे 3 आमदार फुटले हे उघड आहे. गुप्त मतदान असल्यामुळे फुटलेल्या आमदार सांगणं सध्या तरी कठीण आहे. पण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसाठी हा सर्वात मोठ्या झटका म्हणावा लागेल.

पाहा व्हिडीओ : एकनाथ शिंदे लवकरच समोर येतील- नीलम गोऱ्हे

मतं पडण्यापेक्षा निवडून येणं महत्वाचं होतं – अहिर

सचिन अहिर यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, मतं पडण्यापेक्षा निवडून येणं महत्वाचं होतं आणि ते आम्ही आलो आहोत. त्याचं विश्लेषण आम्ही निश्चित करु. महाविकास आघाडी म्हणून त्यांनी आम्हाला किती मतं द्यायची होती, आम्ही त्यांना किती मतं द्यायची होती हे वरिष्ठ नेते पाहतील. पण नक्कीच आज आमचा विजय झाला आहे. हा विजय मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि विविध यंत्रणांचा दबाव असून, सुरुंग लावण्याचा प्रयत्न करुनही ज्या आमदारांनी आम्हाला मतदान केलं त्यांना मी समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी विजयानंतर दिलीय.

उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली

दरम्यान, शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असले तरी शिवसेनेची हक्काची आणि सहयोगी अपक्षांचीही मतं फुटली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या विजयाचा आनंद असला तरी फुटलेल्या मतांबाबत चिंतन आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय केला जाण्याची शक्यता आहे.

विधान परिषद निवडणुतील विजयी उमेदवार

भाजप

  1. >> प्रवीण दरेकर – 29 मते
  2. >> श्रीकांत भारतीय – 30 मते
  3. >> राम शिंदे – 30 मते
  4. >> उमा खापरे – 27 मते
  5. >> प्रसाद लाड – 28 मते

राष्ट्रवादी काँग्रेस

  1. >> रामराजे नाईक निंबाळकर – 29 मते
  2. >> एकनाथ खडसे – 28 मते

काँग्रेस

  1. >> भाई जगताप – 26 मते
  2. >> चंद्रकांत हंडोरे – 22 मते (पराभूत)

शिवसेना

  1. >> सचिन अहिर – 26 मते
  2. >> आमशा पाडवी – 26 मते