विधानसभा अध्यक्षांंचं कार्य काय? कोणकोणते अधिकार?
विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत व्यापक अधिकार आहेत.
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस आमदार नाना पटोले (Nana Patole) यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे नाना पटोले बिनविरोध (Assembly Speaker Rights) निवडून आले. शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा आक्रमक नेता अशी पटोलेंची ओळख आहे.
महाविकासआघाडीकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नाना पटोले तर भाजपकडून किसन कथोरे यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते.
‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशा महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यादृष्टीने सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला कालपासून विचारणा करण्यात आली होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि देवेंद्र फडणवीस आणि मी (चंद्रकांत पाटील) यांनी चर्चा केली. विधानसभा अध्यक्षपद हे वादातीत असावं, अशी महाराष्ट्राची परंपरा आहे, ती कायम राहावी, यासाठी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.’ असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
विधानसभा अध्यक्षांचं काम काय?
विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत व्यापक अधिकार आहेत.
विधानसभा अध्यक्षांची निवड सदस्यांद्वारे मतदान प्रक्रियेद्वारे होते. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाकडून उमेदवार विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतात.
सदनाच्या आवारात विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च अधिकार असतात. विधानसभेची व्यवस्था टिकवून ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि विधानसभेतील सदस्यांनी नियमांचे पालन केले आहे, की नाही, यावर ते देखरेख करतात.
सभागृहातील सर्व सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आदरपूर्वक ऐकणं अपेक्षित असतं. ते सभागृहाच्या चर्चेत सहभाग घेत नाहीत, परंतु ते विधानसभेच्या कामकाजादरम्यान आपला निर्णय देतात. विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष कामकाज पाहतात.
शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा आक्रमक नेता विधानसभा अध्यक्षपदी, नाना पटोले यांची कारकीर्द
सभागृहातील एखाद्या सदस्याला आमदारकीचा राजीनामा द्यायचा असेल, तर तो विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द (Assembly Speaker Rights) करतो.
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले
नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. यापूर्वी नाना पटोले हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार होते. 2014 ते 2017 या कालावधीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर खासदारकी भूषवली.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार अपयशी ठरत आहे, असं सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोलेंनी हल्लाबोल चढवला होता. 2017 मध्ये नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसच्या गोटात सहभागी झाले.
नाना पटोले यांनी 2019 मध्ये नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी साकोली मतदारसंघातून भाजपच्या परिणय फुके यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली. या हायव्होल्टेज लढतीत ते विजयी होऊन विधानसभेवर निवडून आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नेते म्हणून नाना पटोले यांची ओळख आहे. पटोले आक्रमक असले तरी ही आक्रमकता योग्य ठिकाणी वापरु, अशी प्रतिक्रिया त्यांनी उमेदवारीच्या घोषणेनंतर दिली होती.
Assembly Speaker Rights