विदर्भात राष्ट्रवादीला भगदाड, माजी मुख्यमंत्र्यांचे घराणे शिवसेनेत प्रवेश करणार
राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार मनोहर नाईक यांच्यासह त्यांचे चिरंजीव इंद्रनील नाईकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार आहे.
यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गेल्या काही दिवसात अनेक दिग्गजांनी पक्षाला रामराम करत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही शिवसेनेत प्रवेश करत राष्ट्रवादीला मोठा झटका दिला. आता विदर्भातही राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मनोहर नाईक (Manohar Naik) आणि त्यांचे चिरंजीव इंद्रनील नाईकही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचं हे घराणं आहे.
राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार मनोहर नाईक यांच्यासह त्यांचे चिरंजीव इंद्रनील नाईकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याासोबत मनोहर नाईक आणि इंद्रनील नाईक यांची उद्या (30 जुलै) बैठक होणार आहे. या बैठकीनंतर या पित्या-पुत्रांचा शिवसेना पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरणार असल्याचे सांगितलं जात आहे.
यवतमाळ मतदारसंघाच्या विकासासाठी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत मी पक्षप्रवेश घेणार आहे. तसेच माझी कोणावरही नाराजी नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक यांनी केले.
“मतदारसंघातील कामे करण्यासाठी आम्ही पक्ष सोडतोय. आमची शरद पवारांबद्दल कोणतीही नाराजी नाही. काही काळापूर्वी पक्षाच्या कार्यालयात मला एबी फॉर्मसाठी ताटकळत बसून ठेवले होते आणि तिच गोष्ट माझ्या मनाला बोचली असे मत मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केले.”
जिल्यात राष्ट्रवादीमध्ये काम करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आज आमच्या कुटूंबात एकमत झाले असून, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊ असेही इंद्रनील नाईक यांनी सांगितले. दरम्यान आज कार्यकर्त्यांची मते जाणून घेत नंतर याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचेही इंद्रनील नाईक यांनी सांगितले.
इंद्रनील नाईक यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला विदर्भात मोठा फटका बसणार आहे. नाईक परिवाराची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. इंद्रनील नाईक यांच्यासह 10 जिल्हा परिषद सदस्य, पुसन नगर परिषद यासह सर्व क्षेत्रातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय. नाईक परिवार राष्ट्रवादीशी एकनिष्ठ मानला जातो. दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचं हे घराणं आहे. पण या विधानसभेला मनोहर नाईक यांच्यासह इंद्रनील नाईक यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी सोडणार असून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे नाईक यांना या मतदारसंघातून तिकीट मिळू शकते अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भगदाड
विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आजी माजी आमदार भाजपच्या संपर्कात असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्रीही भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती भाजप प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी दिली.
कोण आहेत मनोहर नाईक?
मनोहर नाईक हे प्रत्येक सरकारमध्ये मंत्री होते. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचं हे घराणं आहे. इंद्रनील नाईक हे सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आहेत. पुसदमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादीला कधीच खिंडार नव्हती. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मनोहर नाईक यांचे पुतणे निलय नाईक यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि जिल्हा परिषदही भाजपला जिंकून दिली. पण बालेकिल्ला हातचा जाऊ नये यासाठी इंद्रनील नाईक यांनाच भाजप किंवा शिवसेनेत पाठवण्याचा मनोहर नाईक यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.
संबंधित बातम्या :
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुतण्या शिवसेनेच्या वाटेवर