रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम आहे, विजय शिवतारे यांची पवारांवर जहरी टीका
विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुती अजित पवार यांची अडचण झाली आहे. बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांची भावजय सुनेत्रा अजित पवार यांनी उभे करण्याची रणनीती आखली आहे. परंतू विजय शिवतारे यांनी बारामती लढविण्याचा निर्णय घेऊन दोन्ही पवारांविरोधात शड्डू ठोकले आहेत.
पुणे : पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती येथून लोकसभा निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने महायुतीत टेन्शन वाढले आहे. बारामतीतील लढत ही केवळ विजय शिवतारे आणि सुप्रिया सुळे यांच्यात होईल असे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. मी लढतोय ते जिंकण्यासाठीच. ही लढाई खूप मोठी आहे. सत्तर वर्षांत यांनी केले, फक्त घुसले आणि घुसखोरीच केली. पवार यांनी ग्रामीण टेररिझम केला आहे. मी यांचा पवारांचा ग्रामीण दहशतवाद मोडून टाकणार आहे. माझ्या माणसांना त्रास दिला जात आहे. अजित पवार यांनी खूप पापं केली आहेत अशी आरोपांची मालिकाच विजय शिवतारे यांनी केली आहे.
विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच अडचण केली आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत घालूनही ते ऐकायला तयार नाहीत. वेळ पडली तर आपण अपक्ष निवडणूक लढवून अशी गर्जना विजय शिवतारे यांनी केली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांना माहीती आहे मी कोण आहे. ईस्ट इंडिया कंपनी गेली नंतर शरद पवार कंपनी आली, शरद पवार आणि अजित पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रम्हराक्षस आहे. दोघांचा खात्मा करायचा असे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.
पवारांना बाजार दाखविण्याची वेळ
आपल्या विरोधात आरोप केले जात आहेत. राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मी शरद पवारांचा माणूस असल्याचे सांगितले जात आहे. सुनील तटकरे म्हणतात की शिवतारेंची स्क्रिप्ट कोण लिहून देते ते माहीती आहे. असा नालायकपणा मी कधीच करणार नाही. मी लढतोय ते जिंकण्यासाठी. लढाई पवारांच्या विरोधात आहे. अजित पवार यांनी गोळीबार केला, शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. तेव्हा तुम्ही गप्प राहिलात. पवारांनी प्रचंड अन्याय केले आहेत. कपट कारस्थानी पवारांनी अनेकांना संपवलं आहे. आता यांना बाजार दाखवण्याची वेळ आली आहे असे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.