विजय वडेट्टीवारांच्या खात्याचं नाव पुन्हा बदललं!
'माझा बंगला पावसाळ्यात गळत होता, म्हणून नूतनीकरण केलं, लाखोंचा खर्च केला नाही, असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं
मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे असलेल्या खात्याचं पुन्हा एकदा नामकरण करण्यात आलं आहे. इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण या विभागाला ‘बहुजन कल्याण’ खाते असं सर्वसमावेशक नाव (Vijay Wadettiwar Ministry Name Change) देण्यात आले आहे.
याआधी, मदत पुनर्वसन ऐवजी ‘भूकंप पुनर्वसन’ खाते असं नाव दिल्यामुळे विजय वडेट्टीवार काहीसे खट्टू होते. त्यानंतर आता वडेट्टीवारांकडील दीर्घ नाव असलेल्या दुसऱ्या खात्यालाही लहान रुप मिळालं आहे.
दरम्यान, आदिवासी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ओबीसी आरक्षण कमी केलं आहे. 50 टक्क्यांवरती आरक्षण जात नव्हतं, म्हणून आरक्षण कमी केलं. ते ओबीसीच केलं. आता 50 टक्क्यांची मर्यादा राहिली नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण 19 टक्के करण्याचा निर्णय होईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
‘माझा बंगला पावसाळ्यात गळत होता, म्हणून नूतनीकरण केलं, असंही विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं. मी लाखो रुपये खर्च केला नाही. इतर मंत्र्यांचे मला माहित नाही, असं वडेट्टीवार म्हणाले. चंद्रकांत पाटील यांना अजूनही सत्तेत असल्याची स्वप्नं पडत आहेत. दिल्लीत त्यांच्या हातात भोपळा आला आहे. आम्ही पाच वर्षे पूर्ण करु. त्यांनी दिल्लीत दारोदार मत मागत भटकत रहावं, असा टोलाही वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar Ministry Name Change) लगावला.