शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार : विजय वडेट्टीवार
महासेनाआघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होईल, त्याबाबत आम्हाला आनंद आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
नागपूर : “शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झाला आहे. राज्यातील नेत्यांचं एकमत आहे. हा ड्राफ्ट लवकरच हायकमांडकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar on Maharashtra CM post and Government formation) यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.
महासेनाआघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होईल, त्याबाबत आम्हाला आनंद आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. महासेनाआघाडीच्या मसुद्याबाबत दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी अंतिम निर्णय घेणार आहेत. हायकमांड मसुद्यात काय बदल करायचे असेल त्या सूचना देतील. चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ, असं वडेट्टीवारांनी सांगितलं.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच
सरकार बनवायला वेळ लागणार नाही, पण स्थिर सरकार हवं ही आमची भूमिका आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका ही किमान समान कार्यक्रमाबाबत एकमत यासाठी आहे. ते एकमत झालं आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. भाजपने शब्द फिरवल्याने शिवसेनेने काडीमोड घेतला. भाजपने मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यायला हवं होतं. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्यायला हवं होतं. मेहबुबा मुफ्तीसोबत जाऊ शकता, मग शिवसेनेसोबत का नाही? असा सवालही वडेट्टीवारांनी विचारला.
शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव होता. सेनेला मुख्यमंत्रिपद द्यायलाच हवं, ते महासेनाआघाडीत मिळतंय तर आनंद आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
राष्ट्रवादीचीही जाहीर भूमिका, मुख्यमंत्री शिवसेनेचाच
दरम्यान, काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाची भूमिका स्पष्ट होत असताना, तिकडे राष्ट्रवादीने यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असं जाहीर सांगितलं आहे. ‘सारखा-सारखा हा प्रश्न का विचारला जातो, की मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार का? मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद झाला होता. त्यामुळे निश्चितच शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार. शिवसेनेला अपमानित करण्यात आलं होतं. त्यांचा स्वाभिमान कायम राखणं ही आमची जबाबदारी आहे’ असं नवाब मलिक ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
(Vijay Wadettiwar on Maharashtra CM post and Government formation)
संबंधित बातम्या
आधी राष्ट्रवादी, आता काँग्रेसचीही भूमिका जाहीर, मुख्यमंत्रिपदाचा तिढा जवळपास निकाली