पुणे : ऐनवेळी पक्षात आलेल्या अभिनेता अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने शिरुर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तयारी करत असलेले राष्ट्रवादीचे विलास लांडे यांचे कार्यकर्ते दुखावले आहेत. याविरोधात विलास लांडेंच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी सुरु केली आहे. अमोल कोल्हेंना निवडणुकीत आम्ही पाडणार, असं या पोस्टरमध्ये म्हटलं आहे.
विलास लांडेंच्या कार्यकर्त्यांकडून एक पोस्टर लावण्यात आलंय. अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून लढणार… आम्ही त्याला आमची ताकद दाखवणार, लांडे साहेबांनी अडचणीच्या काळात राष्ट्रवादी पक्षाला साथ दिली, पण आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार, कोल्हेला पाडणार, अशा आशयाचा मजकूर या पोस्टरमध्ये लिहिण्यात आलाय.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विलास लांडे यांना काम करण्यास सांगितलं आणि त्यानंतर विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराला सुरवात केली. पण अचानक अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यानंतर अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. अमोल कोल्हे यांचे नाव आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार थंड पडल्याचं चित्र शिरूर मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे.
अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराज मालिकेतून लोकप्रिय झाले. त्यांची लोकप्रियता लक्षात घेत विलास लांडे यांनी केलेल्या प्रचारात कोल्हे विजय होतील, अशी राष्ट्रवादीला अपेक्षा आहे. पण उमेदवारीवरुन आता नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. या सर्व गोंधळामध्ये राष्ट्रवादीचा प्रचार मात्र थंड पडलाय.
शिरुरमध्ये विद्यमान खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनाच पुन्हा शिवसेनेकडून तिकीट देण्यात येणार आहे. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यांची लढत अमोल कोल्हेंविरुद्ध होईल.