पंकजा मुंडेंमुळे मंत्रीपद मिळालं नसल्याची खदखद, बीडमध्ये मेटे राष्ट्रवादीला मदत करणार
बीड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांना धक्कातंत्र सुरुच आहे. बीडमध्ये शिवसंग्रामचे विनाटक मेटे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं सांगितलंय. बीडमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत मेटेंनी ही भूमिका जाहीर केली. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मेटेंच्या या भूमिकेचं स्वागत केलंय. बीडमध्ये ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचं वैर आहे. त्यामुळे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामने बीडमध्ये भाजपला […]
बीड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांना धक्कातंत्र सुरुच आहे. बीडमध्ये शिवसंग्रामचे विनाटक मेटे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं सांगितलंय. बीडमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत मेटेंनी ही भूमिका जाहीर केली. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मेटेंच्या या भूमिकेचं स्वागत केलंय. बीडमध्ये ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचं वैर आहे. त्यामुळे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामने बीडमध्ये भाजपला मदत करणार नसल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं.
भाजपसोबत रहायचं असेल, तर संपूर्ण राज्यात सोबत रहावं लागेल, इथे मदत करतो आणि तिथे नाही हे चालणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. तरीही विनायक मेटेंनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. दरम्यान, प्रचार सुरु झाल्यापासून युतीच्या बॅनरवर बीडमध्ये आतापर्यंत विनायक मेटेंचा फोटो दिसला नाही. त्यामुळे ते सोबत नसल्याचं भाजपने गृहीत धरलं होतं.
भाजपला नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी पाठिंबा जाहीर केलाय. विशेष म्हणजे ते भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांचा प्रचारही करत आहेत. तर दुसरीकडे विनायक मेटेंनी भाजपला विरोध केलाय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मेटेंचा बीड शहर मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर यांनी पराभव केला होता. यानंतर भाजपने मेटेंचं राजकीय पुनर्वसन करत त्यांना विधानपरिषदेवर नेलं. पण आपल्याला मंत्रीपद हवं यावर मेटे ठाम होते आणि हे मंत्रीपद पंकजा मुंडे यांच्यामुळे मिळालं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बीडमधील सभेतही त्यांनी हा आरोप केला.
दरम्यान, बीड वगळता राज्यात भाजपसाठी काम करणार असल्याचं मेटेंनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसे चांगले आहेत हे सांगत त्यांनी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी काम करणार असल्याचंही सांगितलं. पण यावर भाजपकडून काय निर्णय घेतला जातो ते पाहणं महत्त्वाचं आहे.