नारायण राणेंना लवकरच मंत्रिमंडळातून डच्चू? ठाकरे गटाच्या नेत्याने काय सांगितलं?
केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा सर्वात खराब परफॉर्मन्स असल्याचं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय.
प्रदीप कापसे, मुंबईः नारायण राणे (Narayan Rane) हा संभ्रमित झालेला माणूस आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा सर्वात खराब परफॉर्मन्स आहे. त्यामुळे त्यांना कधीही डच्चू दिला जाऊ शकतो, असं वक्तव्य ठाकरे (Thackeray) गटाच्या नेत्याने केलंय. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपाने नारायण राणे यांना पक्षात घेतल्यानंतर जी घाण पदरी पाडून घेतली आहे, असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय. संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या एका वक्तव्यावरून त्यांना कोर्टाची नोटीस बजावण्याची तयारी सुरु केली आहे. ही भूमिका योग्यच असल्याचं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय.
विनायक राऊत काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नारायण राणे हा संभ्रमित झालेला माणूस आहे.. आपलं स्थान टिकवण्यासाठी ते सातत्याने उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका करत सुटलेत, त्यामुळे संजय राऊत यांनी पाठवलेली नोटीस योग्यच असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलंय.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपात घेऊन पक्षाने घाण पदरी पाडून घेतली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा सर्वात खराब परफॉर्मन्स असल्याचं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय.
पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं..
अदानी हे स्वतःचा जावई असल्यासारखं मोठा करण्यात आलंय. मात्र हिंडेनबर्गने हा फुगा फोडलाय. आता या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांची नोटीस
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना वकिलांमार्फत नोटीस बजावली आहे. 2004 साली तुमचं नाव मतदार यादीत नव्हतं, मीच तुम्हाला खासदार केलं, पैसे दिले, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. हे वक्तव्य सिद्ध करून दाखवा, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलंय.
भाजप नेते किरीट सोमय्या आणि नारायण राणे यांना पोपटलाल अशी उपमा नारायण राणे यांनी दिली. हे उठसूठ शिवसेना नेत्यांविरोधात बेताल वक्तव्य करतात. मात्र इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही, या सर्व आरोपांना कायदेशीर नोटीस बजावली जाईल, अशी प्रतिक्रिया आज संजय राऊत यांनी दिली.