नागपूर : काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी चौकशी सुरु आहे. याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देशभरात आंदोलन (Congress Protest) पुकारण्यात आलंय. राजधानी दिल्लीत काँग्रेस खासदार राहुल गांधीही या आंदोलनात सहभागी झाले. त्यावेळी पोलिसांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ताब्यात घेतलं. महाराष्ट्रातही विविध शहरात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीपीओ चौकात गाडी पेटवून दिली. त्यामुळे परिसरात तणाव पाहायला मिळालं. या प्रकारानंतर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.
तिकडे राजधानी दिल्लीय सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात राहुल गांधी यांच्यासह हजारो काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. राहुल गांधी यांनी राजपथ मार्गावर रस्त्यावर बसून आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना घेरलं. जवळपास अर्धा तास राहुल गांधी रस्त्यावर आंदोलन करत होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतलं.
भाजपा की तानाशाही अब खुलकर सामने है। संसद में जरूरी मुद्दों पर चर्चा नहीं कर सकते और सड़क पर जनता की आवाज नहीं उठा सकते।
पुलिस और एजेंसियां लगाकर तानाशाह सरकार विपक्ष को दबाना चाहती है।
यह सच की लड़ाई है न झुकेंगे, न डरेंगे
लड़ेंगे, जीतेंगे। pic.twitter.com/xk0WGLq0q5— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 26, 2022
ईडीने समन्स बजावल्याने सोनिया गांधी आज पुन्हा ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. त्यांच्यासोबत प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही होते. सोनिया गांधी ईडी कार्यालयात गेल्यानंतर राहुल गांधी परत आले. तर सोनिया गांधी आजारी असल्याने प्रियंका यांना त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रियंका गांधी या सुद्धा सोनिया गांधी यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात आहेत.
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. काही वेळ आंदोलन चालल्यानंतर पोलिसांनी नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेतलं. त्यावेळी नाना पटोले यांनी केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली.