भाजपविरोधात सांगलीचा उमेदवार अखेर ठरला!
सांगली : भाजपने उमेदवारी जाहीर करुन प्रचारात आघाडी घेतल्यानंतर विरोधकांचा सांगलीचा उमेदवार ठरलाय. काँग्रेसने सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. त्यामुळे स्वाभिमानीकडून दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. काँग्रेसने सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडल्यामुळे काँग्रेस नेते आणि […]
सांगली : भाजपने उमेदवारी जाहीर करुन प्रचारात आघाडी घेतल्यानंतर विरोधकांचा सांगलीचा उमेदवार ठरलाय. काँग्रेसने सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. त्यामुळे स्वाभिमानीकडून दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
काँग्रेसने सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडल्यामुळे काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यांचे बंधू विशाल पाटील यांनी अखेर स्वाभिमानीकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या 60 वर्षांपासून वसंतदादा पाटील घराण्याची सांगली लोकसभा मतदारसंघावर एकहाती सत्ता होती. पण 2014 ला मोदी लाटेत प्रतिक पाटील यांचा भाजपचे संजय काका पाटील यांच्याकडून पराभव झाला होता.
सांगलीच्या जागेवरुन राजू शेट्टी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चर्चा झाली. त्या बैठकीत विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे सांगलीच्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला तिढा अखेर सुटला. पण या एका जागेवरुन काँग्रेसमध्ये संपूर्ण जिल्ह्यात गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. आता कार्यकर्त्यांना एकत्र जमवण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे.
सदाभाऊंचा राजू शेट्टींवर निशाणा
राजू शेट्टी यांचे एकेकाळचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी आता त्यांच्याच जुन्या मित्रावर जोरदार टीका केली आहे. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते नसून कारखानदारांचे नेते आहेत. मांजर ज्याप्रमाणे आपल्या पिल्लाला खाते, त्याप्रकारे त्यांना संघटनेत कोणीही मोठं झालेलं चालत नाही. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप केला, आता विशाल पाटील यांची उमेदवारी काय आहे? त्यामुळे त्यांचं आणि कारखानदारांचं साटंलोटं आहे, असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. ते सांगोला येथे भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचासासाठी आयोजित मेळाव्यात आले होते.