मला ओटीत घ्या, ही माझ्या इज्जतीची निवडणूक, धनंजय मुंडेंची भावनिक साद
बीड : राज्यभरातील प्रचारात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंवर जहरी टीका करणारे त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीकरांना भावनिक साद घातली आहे. ही माझ्या इज्जतीची निवडणूक आहे, मला ओटीत घ्या, असं भावनिक आवाहन त्यांनी केलं. शिवाय अण्णा गेल्यानंतर घरातला कर्ता पुरुष मी आहे, त्यामुळे काहीही झालं तरी तुमचा मोठा भाऊ आहे हे विसरु नका, […]
बीड : राज्यभरातील प्रचारात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंवर जहरी टीका करणारे त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीकरांना भावनिक साद घातली आहे. ही माझ्या इज्जतीची निवडणूक आहे, मला ओटीत घ्या, असं भावनिक आवाहन त्यांनी केलं. शिवाय अण्णा गेल्यानंतर घरातला कर्ता पुरुष मी आहे, त्यामुळे काहीही झालं तरी तुमचा मोठा भाऊ आहे हे विसरु नका, असं भावनिक आवाहन त्यांनी पंकजा मुंडेंना केलंय.
दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार आहेत. परळीत राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी सभा झाली. बीडसह 10 जागांसाठी 18 तारखेला मतदान होणार आहे. या सभेत धनंजय मुंडेंनी पंकजांवर जोरदार टीका केली. तुमच्या खासदार दबंग असतील, तर आमदाही उमेदवार बजरंग आहे, असं ते म्हणाले. बजरंगानेच तुम्हाला पळता भुई थोडी केली आहे, विधानसभेला मी समोर असेल, असा इशाराही धनंजय मुंडेंनी दिला.
“मी मोठा भाऊ आहे हे विसरु नका”
बीड जिल्ह्याने दोन्ही बहिणींना भरभरुन दिलं. राज्यात आणि केंद्रात सत्ता दिली. पण माझ्या बहिणीला माझ्याशिवाय कोणीच दिसेना. पंकजाताई, तुम्हाला नेमका कशाचा गर्व आणि घमेंड आहे. सत्ता येते आणि जाते, असं म्हणत त्यांनी पंकजांवर प्रहार केला.
दरम्यान, पंकजा मुंडेंकडूनच जातीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. कोण कुठल्या जातीचे आहात म्हणून पंकजाताईने सभेत उठायला सांगितलं. जाती-धर्माचं राजकारण तुम्हीच करता. पंडित अण्णा गेल्यानंतर मी घरातील कर्ता पुरुष आहे. आपले राजकीय वैर असले तरी मी तुमचा मोठा भाऊ आहे हे लक्षात ठेवा, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
पंकजांना धनंजय मुंडेंचे पाच प्रश्न
बीड जिल्ह्यातील विकासकामांवरुनही धनंजय मुंडेंनी पंकजांवर टीका केली. ते म्हणाले, “मला पंकजाताईंना पाच प्रश्न विचारायचे आहेत. मी भाजपची मोठी नेता आहे, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे बोलतात. मग रेल्वेचा डबा बनविण्याचा परळीचा कारखाना लातूरला कसा गेला? परळी-मुंबई रेल्वे तीन वर्षांपासून बंद का आहे? दोन बहिणींना रेल्वे परळीतून चालू करता आली नाही का? आमचं जोतिर्लिंग पळवून नेलं आणि आमच्या बहिणी झोपल्या होत्या का? परळीचं जोतिर्लिंग झारखंडमध्ये गेलं. कारखाना बंद पडेल म्हणून मी विनवणी केली होती. आज कारखाना डबघाईला आला आहे. 650 कोटींचं कर्ज कारखान्यावर आहे. पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांसोबत राजकारण केलं. पक्ष पाहून ऊस घेतला गेला,” असा आरोप धनंजय मुंडेंनी केला.
“पंकजांनी प्रभू वैद्यनाथालाही फसवलं”
गल्ली ते दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. विकास कुठे आहे दाखवा. राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे श्रेय घेताय. तुम्ही मोदींना रोजच बोलताय असं समजलं. मग परळी ते अंबाजोगाई रस्ता का केला नाही? चार वेळा बायपासचं उद्घाटन केलं, पंकजाताई लाज वाटत नाही का, परळीच्या जनतेला फसवू नका. प्रभू वैद्यनाथालाही फसविले, असा घणाघात धनंजय मुंडेंनी केला.
“मला ओटीत घ्या”
धनंजय मुंडेंनी परळीतल्या मतदारांना भावनिक सादही घातली. ही निवडणूक माझ्या इज्जतीची आहे. अनेकदा बहिणीला ओटीत घेतलं. एकदा मलाही ओटीत घ्या. परळीचा विकास औरंगाबादच्या पुढे नेईन. मला विरोधीपक्ष नेते करताना पवार साहेबांनी जात पाहिली नाही. तुम्ही जातीवाद करू नका, असं आवाहन त्यांनी केलं.
बॅनरवरील माझा फोटो टॉप 3 मध्ये आहे. ते वारसा हक्काने नाही तर कर्तृत्वाने मिळाले आहे. माझ्या बहिणीला वारसा हक्काने सर्वच मिळालंय. बहिणीचं मोठेपण घेऊन चाटायचं आहे का? कधीही सुखा-दुःखात आले नाहीत. विधानसभेत मी पडलो तरी चालेल, पण लोकसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून द्या, असं आवाहन धनंजय मुंडेंनी केलं.